दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध
ICICI बॅंकेतील एक वरिष्ठ अधिकारी श्री. निरंजन लिमये यांची साउथ आफ़्रिका व रशिया या देशांत बदली झाली होती. त्यांचेबरोबर त्यांची पत्नी सौ.ललिता (M.Sc.) याही तेथे गेल्या होत्या. भौगोलिक, सांस्कृतिक व अनेक दृष्टीने भिन्न असलेल्या या देशांतील त्यांच्या अनुभवावर आधारित असे सौ. ललिता लिमये यांचे भाषण ऐकण्याचा योग सोबती सभासदाना दिनांक ३ जून २००९ आला. साउथ अफ़्रिकेत त्यांचा मुकाम जोहान्स्बर्ग या शहरात होता. प्रथम त्यानी साउथ अफ़्रिकेच्या जडणघडणीची माहिती दिली.
साउथ आफ़्रिका हे आत्यंतिक वर्णद्वेषाचे माहेरघर होते. तेथील मूळ रहिवासी कृष्णवर्णीय लोक. जगाशी फारसा संबंध नसल्याने ते मागासलेले होते. साम्राज्यवादी ब्रिटीशानी हा प्रदेश काबीज केला. निसर्ग संपन्नता, हिर्यांच्या खाणी, विपुल खनिजे, सुपीक जमीन, विस्तीर्ण जंगले यांचा पुरेपूर फायदा उठवून ब्रिटीशानी तेथे आपले बस्तान बसवले व स्वतःच्या निराळ्या वसाहती निर्माण केल्या. मात्र तेथील गरीब, अशिक्षित कृष्णवर्णीय लोकांचा त्यानी अमानुष छळ केला व त्यांच्यामधील मनुष्य शक्तीचा फायदा घेउन स्वतः संपन्न झाले पण काळ्या लोकाना चार हात दूरच ठेवले. १८९२ तो १९१४ पर्यंत गांधीजी आफ़्रिकेत होते व भारतीय व काळे म्हणून भारतीयांचीही ब्रिटीशांच्या छळातून सुटका झाली नाही. मात्र गांधीजीनी गोर्यांच्या जुलुमाला कडाडून विरोध केला आणि तेथील कृष्णवर्णीय लोक व अफ़्रिकास्थित भारतीय याना वर्णभेदाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. हळूहळू कृष्णवर्णीयांमध्येही जागृती होऊ लागली. तरीही जराही विरोध झाला की विरोधकाना रोबेन आयलंड या ठिकाणी बंदीत ठेऊन त्यांचा विरोध मोडून काढला जात असे.
गांधीजींपासून प्रेरणा घेतलेले नेल्सन मंडेला यानी पुढाकार घेउन ब्रिटीशाना उघड उघड विरोध करायला सुरुवात केली. परिणामी त्याना एकूण २७ वर्षांचा तुरुंगवास घडला. त्यांच्या सुटकेनंतर हळूहळू सत्तांतर सुरु झाले व नेल्सन मंडेला साउथ आफ़्रिकेचे पहिले अध्यक्ष झाले. मात्र गांधीजींच्या शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने त्यानी हे स्थित्यंतर रक्तरंजित होऊ दिले नाही.
मात्र स्वतःच्या फायद्यासठी का होईना ब्रिटीशानी अनेक शहरे निर्माण केली, स्वतःसाठी निराळ्या वसाहती निर्माण केल्या, मोठ्या रस्त्यानी शहरे जोडली. आधुनिक शाळा, बागा, हॉस्पिटल्स, थिएटर्स, दुकाने बांधली. पण गोर्या लोकांखेरीज इतराना त्यांत मज्जाव असे.मात्र साउथ अफ़्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सारे बदलले आहे व साउथ अफ़्रिकेला जगात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
जोहान्सबर्ग शहर आधुनिक साधनानी सज्ज आहे. उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांचे दुभाजक गुलाबांच्या फुलानी सजविलेले आहेत. वाहतुकीचे नियम सर्वजण पाळतात. कुठेही नळावरचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ असते. शहराची रचना सुंदर आहे. हवेचे प्रदूषण नाही. रस्त्यांच्या दोन्ही बाजूना लावलेल्या हिरव्यागार वृक्षांमुळे सारा परिसर नयनरम्य झाला आहे. सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव साधन कॉम्बी व्हॅन. आपल्याकडील बेस्ट सारख्या बसेस तुरळक प्रमाणात धावतात.घरे खूप मोठी. काळ्या बायका घरकामासाठी मिळतात. नोकरवर्ग कमी मोबदल्यात मिळतो. उत्कृष्ट भाजीपाला व फळे मुबलक मिळतात. जोहान्सबर्गचे हवामानही सुंदर आहे. उन्हाळ्यात पाउस पडतो त्यामुळे उन्हाळा सुसह्य होतो. थंडी कडक असते.
सध्याचे राज्य काळ्या लोकांचे आहे. तिथे गोरे लोक फक्त ९ टक्के आहेत. उद्योगधंदे, राजकारण यात काळे व भारतीय यांचे वर्चस्व आहे. देशाचे सरासरी जीवनमान ४० वर्षे आहे. एड्स या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे व ही मोठी चिंतेची बाब आहे.
रशिया - मुक्काम मास्को
रशिया म्हटले की आठवते झार राजांची जुलमी राजवट, लेनिन, बोल्शेविक संघटना व विशेषेकरून स्टॅलीन. दुर्दैवाने रशियाचा इतिहास रक्तरंजित आहे. धर्माच्या संकल्पनेला विरोध व सत्तेच्या विरोधकांची कत्तल यामुळे बळींची संख्या कोटीत जाते. लेनिनने KGB नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती आणि त्यामुळे जनतेला हाल सोसावे लागले. आज त्या संघटनेचे नवे नाव FSB असे आहे. पूर्वीप्रमाणे आता रशिया एकसंघ नाही व सध्याचे त्याचे चित्र खूपच निराळे आहे. महागाई फार आहे. स्त्रियाना महत्व आहेच व बरीचशी कामे त्याच करतात. बागा, जंगले, तळी खूप आहेत. लोक स्वच्छतेबद्दल बेफ़िकिर असतात पण सरकार ते काम करते. रस्ते चांगले राखले जातात. ९X९ लेनचे प्रशस्त रस्ते आहेत. रशियात साधनसंपत्ती खूप आहे. ट्राम, ट्रेन, बसेस या वाहनांमुळे सार्वजनिक वाहतूक चांगली आहे. शिवाय उत्तम भुयारी रेल्वेमार्गही आहेत. नद्या व नद्यांचे काठ सुंदर राखले आहेत. रशियामध्ये परकीयांकडे पासपोर्ट असणे अत्यावश्यक असते. लिफ़्टमध्ये गुप्तता पाळली जाते व आपल्याला बटन दाबता येत नाही. ट्रेनमधून प्रवास केला तर प्रवासी वाचनात दंग असलेले दिसतात. इतरांशी फारसे बोलत नाहीत. घरी यायचे निमंत्रण नसते. पाळीव कुत्रे सर्रास आढळतात. आंघोळीची पद्धत अभावानेच आहे. व्होडका दारू सर्रास प्याली जाते पण त्याचा वास भयानक असतो. भोजनामध्ये विविधता नाही. आर्थिक सुरक्षा नाही त्यामुळे लोक खर्चिक होतात. स्विमिंग, बॅलेट,स्केटिंग यांचे वर्ग चालतात. रशियन माणूस क्वचितच हसतो. मात्र ओळख झाल्यावर कोणतीही मदत करायला तयार असतो. अनेक पाकिस्तानी, बंगलादेशी रशियन मुलींशी लग्न करतात. शिक्षणाचे प्रमाण खूप आहे. मास्को स्टेट युनिव्हर्सिटीची ३७ मजल्यांची इमारत आहे. टूरिझम फारसे नाही. रेड स्क्वेअर येथे म्युझीयममध्ये लेनीनचे प्रेत ठेवले आहे. ६०० वर्षांचे जुने चर्च आहे. रशियन सर्कस चांगली असते. कला देशाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाते. पासपोर्ट दाखविल्याशिवाय क्रेडिट कार्डाचे पैसे काढता येत नाहीत. मात्र अमेरिकन मॅकडोनाल्ड ब्रेड तेथे मिळतो. रशियात लोकशाही नावालाच आहे. सारा कारभार सध्याचे अध्यक्ष पुतिन चालवतात. रशियामध्ये तेल व खनिज साठे भरपूर प्रमाणात असल्याने प्राप्तीचे ते मोठे स्रोत आहेत.
प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित हे भाषण खूपच माहितीपूर्ण ठरले.
Saturday, June 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
एकूण लेख चांगला.
@काळ्या बायका घरकामासाठी मिळतात.
हे वाक्य स्थानिक स्त्रिया घरकाम करण्यासाठी उपलब्ध असतात / कृष्णवर्णीय स्त्रिया घरकामासाठी / आया-मोलकरीण इ. कामांसाठी उपलब्ध असतात असे पण लिहिता आले असते. नाही का?
Post a Comment