तीस वर्षांची अखंड वाटचाल
सोबतीचा वर्धापन दिन
सोबतीचा ३०वा वर्धापन दिन दि. ९ जून २००९ रोजी उत्साहात साजरा झाला.
प्रारंभी श्रीमती नंदा देसाई, वैजयंती साठे, श्री.विजय पंतवैद्य व श्री.विश्वास डोंगरे यानी आपल्या सुस्वर आवाजात स्वागत गीत सादर केले.
सोबतीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पेठे हे परदेशी गेले असल्याने उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यानी समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध नाट्य अभिनेते/गायक श्री रामदास कामत यांचे हार्दिक स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला व उपस्थित सोबती सभासद यांचे स्वागत केले. गोव्यात जन्मलेलेल श्री. रामदास कामत हे पदवीधर आहेत. त्यांचा नाट्य प्रवास वयाच्या सातव्या वर्षापासून सुरु झाला. वडिलांच्या उत्तेजनामुळे त्यानी नाटकात काम करणे सुरु केले व संगीताची जाण असल्याने नाट्य गायनातही त्यानी चमक दाखविली. वडील बंधूंकडून त्यानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांचा नाटक व नाट्यसंगीत असा अखंडित प्रवास अजूनही वयाच्या अठ्ठ्यातराव्या वर्षीही चालू आहे. अनेक नाटकांत भूमिका व गायन यामु्ळे त्यांचे नाव कलाक्षेत्रात सर्वश्रुत झाले. या कलागुणांमुळे त्यांच्याकडे अनेक पुरस्कार चालत आले. सर्वात मानाच्या ‘ विष्णुदास भावे ’ पुरस्काराने ते सन्मानित झाले.बीड येथे होणार्या नाट्यसम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. ही त्यांच्या नाट्य/संगीत सेवेची ही पावतीच म्हणावी लागेल.त्यानंतर श्रीमती सुनीता क्षीरसागर यानी सोबतीच्या कार्याचा आढावा घेतला.सध्या अमेरिकेच्या दौर्यावर असलेले सोबतीचे अध्यक्ष श्री.मुकुंद पेठे व पुण्याहून श्री द.पां. बापट यांच्या शुभ संदेशांचे वाचन श्रीमती. सुनंदा गोखले यानी केले.ज्येष्ठांचा सत्कार हा वर्धापन दिनाचा महत्वाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे श्री रामदास कामत याच्या हस्ते संपन्न झाला. त्यात सहस्रचंद्रदर्शन प्राप्त झालेले, वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेले सभासद व विवाहाची पन्नास वर्षे पुरी केलेले सभासद पती-पत्नी यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनीता क्षीरसागर यानी उत्सवमूर्तींचा परिचय करून दिला
.
प्रमुख पाहुणे श्री.रामदास कामत यानी भाषणाच्या सुरुवातीला सोबतीचा ३०वा वर्धापन दिन साजरा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व सोबतीची ही वाटचाल कौतुकास्पद आहे असे उद्गार काढले. ते पुढे म्हणाले की सुरुवातीला उत्साहात संस्था स्थापन होतात पण हळूहळू कार्यकर्त्यांच्या अभावी अनेक संस्था बंद पडतात. आज संस्थांमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा अभाव आहे. मात्र सोबतीची ही तीस वर्षांची वाटचाल आनंददायी आहे कारण या संस्थेत उत्साहाने, निरलसपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. सामाजिक बांधिलकीचा विचारही सोबतीमध्ये आहे कारण अनेक गरजू वृद्ध, विद्यार्थी, सेवाभावी संस्था याना सोबती यथाशक्ती आर्थिक मदतीचा हातही देते. आज आयुर्मर्यादा वाढली आहे. वयाचा विचार न करत बसता सदा कार्यरत राहून आयुष्य जगावे. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हे विसरुन, आनंदी जीवन जगून ‘संध्याछाया रमविती हृदया’ असे जीवन जगावे. स्नेहाचे इंद्रधनुष्य गुंफावे. शासन ज्येष्ठांकडे फारसे लक्ष देत नाही. तेव्हा आपल्या हाती आहे तितके आनंदी रहावे. आज कुटुंबे विभक्त होत आहेत, अनेक ज्येष्ठांची मुले परदेशात आहेत व त्याना एकाकी आयुष्य जगावे लागत आहे. म्हणून ज्येष्ठांचे प्रश्न शासनाकडे मांडले गेले पाहिजेत.
गोमंतकात फोंड्याजवळ एक वृद्धाश्रम आहे पण त्याचे नाव ‘स्नेहमंदीर’ ठेवले आहे. अनेक ज्येष्ठ तेथे परस्पर स्नेहभावाने आनंदी जीवन जगतात.
संगीत नाटके आता फारशी चालत नाहीत. तरीही नाट्यसम्मेलनाचा अध्यक्श म्हणून यथाशक्ती मार्गदर्शन अवश्य करीन. सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद व प्रसिद्ध नाट्य समीक्षक श्री. शि.मो. घैसास यांचा त्यानी गौरवपूर्ण उल्लेख केला.
शेवटी श्री. कामत यानी समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करून बहुमान दिल्याबद्दल सोबतीचे आभार मानले.
या प्रसंगी सोबतीचे सभासद श्री. स.प. लिमये, श्री पंडितराव व श्री भास्कर जोगळेकर यानी आपले विचार मांडले.
त्यानंतर भाग्यशाली सोडत काढण्यात आली व तीन नशिबवान सभासदाना बक्षिसे देण्यात आली.
कार्याध्यक्श श्री म.ह. देसाई यानी प्रमुख पाहुणे, निमंत्रित, लोकमान्य सेवा संघ, वास्तुशोभा, कॅटरर्स व ज्यानी समारंभ यशस्वी करण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे आभार मानले.
शेवटी अल्पोपहाराने त्या दिवसाच्या समारंभाची सांगता झाली.
Tuesday, June 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment