मी व माझी पत्नी यांनी हल्लीच अमेरिकन ग्रीन कार्ड करून घेतले. त्यासाठी कराव्या लागणार्या दीर्घ खटपटीची माहिती मी लिहितो आहे. माझ्यासारखे जे इतर ज्येष्ठ नागरिक यासाठी प्रयत्नशील वा इच्छुक असतील त्यांना याचा उपयोग होईल असे वाटते.
आपला मुलगा वा मुलगी अमेरिकन नागरिक झालीं असतील तर त्याना आपल्या आईवडिलांसाठी Permenent Resident होण्याची परवानगी मिळवतां येते. त्यालाच green card किंवा Immigrant Visa म्हणतात.
मुला/मुलीपाशी त्यांचे स्वत:चे birth certificate असते. त्यावर आईचे नाव असते त्यामुळे आईसाठी परवानगी मागणे सोपे पण वडिलांसाठी मात्र प्रथम काय लागत असेल तर आईवडिलांच्या विवाहाचा दाखला! त्याशिवाय त्यांना वडिल म्हणून कायदेशीर मान्यता नाही! येथूनच सर्व खटपटीला सुरवात होते!
आपल्या पिढीच्या विवाहांचे वेळी विवाहाची नोंद होण्यास नुकतीच सुरवात झाली होती. नवरा-नवरी व उपाध्येबुवा यांच्या सहीने एक अर्ज भरून पाठवावा लागे. पण त्याची सरकारी शिक्का असलेली प्रत मिळाल्यावर ती आपण काळजीपूर्वक जतन करून ठेवलेली बहुधा नसतेच! कारण आपल्याला त्याची कधी गरज पडत नाही. आमचे असेच झाले होते!
आपला विवाह जिथे रजिस्टर केला असेल तेथून दाखल्याची नवीन प्रत मिळाली तर ठीकच पण नाही तर काय? बहुधा ती मिळत नाहीच. त्याला पर्याय एकच. ’आमचेकडे तुमच्या विवाहाची नोंद नाही (किंवा जे कारण असेल ते) त्यामुळे दाखला देतां येत नाहीं’ असे पत्र Registrar of Marriages' कडून मिळविणे. हे पत्र इंग्रजीमध्ये असेल तर ठीक पण मराठीत असेल तर त्याचे इंग्रजी भाषांतर करून घ्यावे लागेल एवढेच नव्हे तर भाषांतर करणाराने ’मी english and marathi' दोन्ही भाषा शिकलो आहे(डिग्रीचा उल्लेख करून) व हे भाषांतर मुळाबरहुकूम बरोबर केले आहे’ असे स्वत:च्या सहीने लिहून द्यावे लागते! (हे सोपस्कार इंग्रजींत नसलेल्या कोणत्याही कागदपत्रासाठी करावे लागतात.)
त्यानंतर, आपल्या विवाहाचे वेळी उपस्थित असलेल्या व त्यावेळी adult असलेल्या एक-दोन व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र करून घेणे. त्यामध्ये आपल्याशी असलेले नाते वा मैत्री याचा स्पष्ट उल्लेख, स्वत:चे नाव, वय, शिक्षण, पत्ता, व्यवसाय इत्यादि माहिती हवी. विवाहाचे वेळी स्वत: उपस्थित असल्याचा निश्चित उल्लेख हवा. वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार करून रु.१०० चे फ्रॅंकिंग करून नोटरीसमोर सही व्हावी लागते.
विवाहाचा दाखला व तो नसल्यास वरीलप्रमाणे रजिस्ट्रारचे पत्र, भाषांतर, दोन प्रतिज्ञापत्रे असे सर्व कागद मुला/मुलीकडे पाठवावे. मूळ कागदच लागतात. इथल्याप्रमाणे gazetted officer च्या सहीच्या प्रती चालत नाहीत. प्रतिज्ञापत्रे करतानाच एक-दोन जादा प्रती बनवून नोटरीकडून ’true copy' सर्टिफिकेट करून घावे. (त्या प्रती पुढे लागतातच!) या कागदांच्या आधारे मुला/मुलीला आई व वडील या दोघांसाठी sponcering ची कार्यवाही सुरू करतां येते. त्यानी दोघांसाठी Sponcership चे papers submit केले कीं पहिला अध्याय संपला!
Tuesday, June 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
माहिती नक्कीच उपयुक्त आहे. Sponcership चे papers कोणत्या concern authority कडे पाठविले जातात व त्यांच्याकडून उत्तर यायला साधारण किती काळ गृहित धरावा लागतो हेही स्पष्ट केल्यास बरे होईल. पुढच्या‘अध्यायाची’ प्रतीक्शा करीत आहोत.
Post a Comment