Tuesday, June 23, 2009

सोबतीचा ३०वा वर्धापन समारंभ : भाग २




वाचक हो ! मंगळवार दिनांक ०९ जून २००९ रोजी संपन्न झालेल्या ‘सोबतीच्या ३०व्या वर्धापन दिनाचे इतिवृत्त आपण वाचलेच असेल. त्याच्या दुस~या दिवशी म्हणजे बुधवार दि.१० जून रोजी वर्धापन सोहोळ्याचे निमित्ताने ‘नाडकर्णी सभागृहात’ एक विशेष कार्यक्रम झाला.

‘आम्ही सोबती, स्वप्न आमुचे आनंदे जगण्याचे...! सोबतीच्या या अर्थपूर्ण शीर्षकगीताचे स्वर मनात घोळवीतच सारे सोबती आजच्या साप्ताहिक सभेला आले होते. सुरुवातीला ‘पारितोषिक वितरणाचा’ कार्यक्रम झाला. दिनांक १८ मार्च ’०९ रोजी सोबती सभासदांसाठी ज्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते, त्या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘विजयी वीरांना’ आजच्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर सुरु झाला तो.. आम्ही सर्व रसिक ज्याची अतिशय उत्कंठेने वाट पहात होतो तो ‘हास्यरंजन’ हा कार्यक्रम ! सुप्रसिद्ध कलाकार श्रीमती उज्वला कुळकर्णी यांनी हा कार्यक्रम अतिशय तयारीने पेश केला. हे मुद्दाम सांगण्याचे कारण.. एकीकडे नोकरी-व्यवसाय करीत असतांना, आतांपर्यंत त्यांनी हास्यरंजनचे १५०० हून अधिक प्रयोग केले आहेत. परदेशातही अनेकदा त्यांनी ‘हास्यरंजन’ केलेले आहे. या त्यांच्या अंगभूत कला गुणांचा महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सन्मान केलेला आहे.
सोबतीमधील आपल्या ‘हास्यरंजन’ कार्यक्रमामध्ये त्यानी अनेक विनोदी किस्से, कविता, चारोळ्या सादर केल्या. मराठी भाषेच्या लवचिकतेमुळे निर्माण होणारे शाब्दिक विनोद, गावांकडे घेतले जाणारे लांबलचक पण तरीही नमुनेदार उखाणे, ‘इरसाल व रोखठोक भाषाशैली’ हीच खासियत असलेल्या (आणि म्हणूनच लोकांचे लक्ष वेधून घेणा~या...!)खास ‘पुणेरी पाट्या’, प्रेमाविष्काराच्या विविध छटा यांद्वारे त्यानी श्रोत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
‘बालपणीचा काळ सुखाचा’ खरा, पण हल्लीच्या स्पर्धात्मक वातावरणामुळे, तो कसा हरवून जातो, शाळकरी मुलांच्या मानसिक विकासाकडॆ पालकांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे,हळूहळू ती जास्तच ‘बिनधास्त’ कशी होतात व त्यांच्या भविष्याची चिंता पालकांनाच कशी सतावू लागते याचे वास्तव चित्रण त्यांनी ‘दहा रुपयांत दहावी ’ या छोट्याशा कथेतून विनोदी अंगाने व तरीही प्रभावीपणाने केले.

परंतू...ही एक कथा सोडली तर श्रीमती. कुलकर्णी यांच्या दोन तासांच्या वक्तृत्वामध्ये, केवळ विनोदनिर्मितीसाठी वारंवार विषयांतर झाल्यामुळे कुठचाही विशिष्ठ असा विषय दिसला नाही ! त्यापेक्षा त्यांनी दोन तीनच कथा पण विनोदी अंगाने, खुलवून, रंगवून सांगितल्या असत्या तर त्या अधिक ‘मनोरंजक’ ठरल्या असत्या आणि ख~या अर्थाने श्रोत्यांचे ‘हास्यरंजन’ही करून गेल्या असत्या असे म्हणावेसे वाटते ! थोडक्यात, ‘हास्यकल्लोळ’ जरी फ़ारसा अनुभवाला आला नाही तरी एकंदर कार्यक्रम, ‘हंशा आणि टाळ्या’ मिळविणारा असल्यामुळे आमचा ‘सोबती’वर्धापन दिन: भाग २ सुद्धां आनंदात साजरा झाला.

2 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

असे केले असते तर कार्यक्रम बरा झाला असता
अशा तर्र्हेची टीका ह्या अहवालात तरी करु नये.फाहुना म्हणून येणारयाची पूर्ण महिति घेतल्यवरच आपण त्यांना बोलवतो मग नंतर त्यावर अशी तीका करून काय साधले? पुढील अहवालात हे टाळावे--क्रुष्णकुमार

विश्वास डोंगरे said...

अभिप्रायाबद्दल आभार !
पहिली गोष्ट म्हणजे हे कार्यक्रमाचे वृत्त आहे, अहवाल नाही, दुसरी गोष्ट..कोणावर विनाकारण टीका करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही.पाहुण्या कलावंताची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच आम्ही त्यांना बोलावीत असतो.सदर कलावंताच्या बाबतीत, ‘हास्याचा धबधबा, प्रचंड हास्यकल्लोळ निर्माण करणारा कार्यक्रम’ अशी माहिती आमच्याकडे आली होती..प्रत्त्यक्ष कार्यक्रम पहातांना तितका अनुभव आला नाही, म्हणून जे दिसले ते स्पष्ट पण चांगल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.