सौ. इंद्रायणी सावकार
काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका
एक मुलाखत
दिनांक १३ मे रोजी सौ. सुजाता जोग यानी प्रथितयश लेखिका सौ. इंद्रायणी सावकार यांची मुलाखत घेउन या उच्च विद्या विभूषित चतुरस्र लेखिकेचा वाङमयीन जीवनपट सोबती सभासदांपुढे उलगडून दाखविला.
सौ. इंद्रायणी सावकार यांची शैक्षणिक कारकीर्द दैदिप्यमान अशीच आहे. मॅट्रीकमध्ये संस्कृतची मानाची जगन्नाथ शंकरशेट व इंग्रजीची दादाभाई नौरोजी पारितोषिके त्यानी मिळविली.पुणे विद्यापीठात संस्कृत (ऑ) मिळवून त्या सर्वप्रथम आल्या. युनिव्हर्सिटी ऑफ़ पॅरीस (Sorbonne) यानी त्याना डी.लिट देऊन त्यांचा सन्मान केला. सध्या त्या दैनिक ‘सामना’च्या उपसंपादिका आहेत.
विनोदी लघुकथा लेखन त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे वैशिष्ट्य. वाङमयाचे इतर प्रकारही त्यानी यशस्वीपणे हाताळले आहेत. २० कादंबर्या, १६ लघुकथा संग्रह इतर मराठी-इंग्रजी वाङमयीन लिखाण याची संख्या ५० च्या वर आहे. इंग्रजी/मराठी नियतकालिकांत लिखाण, आकाशवाणीवर विविध विषयांवरील भाषणे, संस्कृत वृत्तनिवेदिका, दूरदर्शवर मराठी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन याही भूमिका त्यानी पार पाडल्या आहेत.
अनेक ऋषीमुनींच्या कथांचा समावेश असलेले ‘Stories of Sages' हे पुस्तक त्यानी परदेशस्थ भारतीय मुलांना आपल्या पौराणिक संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून लिहिले आहे व परदेशात त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
मुलाखतीत आपल्या वाङमयीन प्रवासाबद्दल बोलताना त्यानी सांगितले की समाजात अवती भवती वावरणारी माणसे व ऐकलेले अनुभव व प्रसंग यानी त्यांच्या कथा कादंबर्याना विषय पुरविले आहेत. प्राय: विनोदी कथाना वाचकांची पसंती मिळाल्याने त्याना अधिकाधिक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली व त्यांच्या इतर साहित्यालाही दाद मिळू लागली. त्यांच्या लेखणीने अनेक विषयात लीलया संचार केला आहे. ओळखीच्या, नात्यातल्या अनेक माणसानी त्यांच्या लिखाणाला विषय पुरविले आहेत. थोडक्यात, त्यांच्या मते डोळसपणे पाहिले, अंगी लिखाणाची आवड व कौशल्य असले तर लिहायला विषय मिळतात व वाचकांचा त्याला प्रतिसादही मिळतो. शिवाय त्या एक उत्तम गृहिणीही आहेत. शिवण, भरतकला, पाककला यातही त्या पारंगत आहेत.
सोबतीच्या काही सभासदानी विचारलेल्या प्रश्नाना त्यानी समर्पक उत्तर दिल्याने मुलाखत रंगतदार झाली.
एका उच्च विद्या विभूषित, चतुरस्र अशा या लेखिकेच्या मुलाखतीने सोबतीच्या सभासदाना त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे जवळून दर्शन झाले.
Thursday, June 04, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Why not a single photograph of Smt. Saavakaar?
Post a Comment