Saturday, June 20, 2009

दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध
ICICI बॅंकेतील एक वरिष्ठ अधिकारी श्री. निरंजन लिमये यांची साउथ आफ़्रिका व रशिया या देशांत बदली झाली होती. त्यांचेबरोबर त्यांची पत्नी सौ.ललिता (M.Sc.) याही तेथे गेल्या होत्या. भौगोलिक, सांस्कृतिक व अनेक दृष्टीने भिन्न असलेल्या या देशांतील त्यांच्या अनुभवावर आधारित असे सौ. ललिता लिमये यांचे भाषण ऐकण्याचा योग सोबती सभासदाना दिनांक ३ जून २००९ आला. साउथ अफ़्रिकेत त्यांचा मुकाम जोहान्स्बर्ग या शहरात होता. प्रथम त्यानी साउथ अफ़्रिकेच्या जडणघडणीची माहिती दिली.
साउथ आफ़्रिका हे आत्यंतिक वर्णद्वेषाचे माहेरघर होते. तेथील मूळ रहिवासी कृष्णवर्णीय लोक. जगाशी फारसा संबंध नसल्याने ते मागासलेले होते. साम्राज्यवादी ब्रिटीशानी हा प्रदेश काबीज केला. निसर्ग संपन्नता, हिर्‍यांच्या खाणी, विपुल खनिजे, सुपीक जमीन, विस्तीर्ण जंगले यांचा पुरेपूर फायदा उठवून ब्रिटीशानी तेथे आपले बस्तान बसवले व स्वतःच्या निराळ्या वसाहती निर्माण केल्या. मात्र तेथील गरीब, अशिक्षित कृष्णवर्णीय लोकांचा त्यानी अमानुष छळ केला व त्यांच्यामधील मनुष्य शक्तीचा फायदा घेउन स्वतः संपन्न झाले पण काळ्या लोकाना चार हात दूरच ठेवले. १८९२ तो १९१४ पर्यंत गांधीजी आफ़्रिकेत होते व भारतीय व काळे म्हणून भारतीयांचीही ब्रिटीशांच्या छळातून सुटका झाली नाही. मात्र गांधीजीनी गोर्‍यांच्या जुलुमाला कडाडून विरोध केला आणि तेथील कृष्णवर्णीय लोक व अफ़्रिकास्थित भारतीय याना वर्णभेदाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. हळूहळू कृष्णवर्णीयांमध्येही जागृती होऊ लागली. तरीही जराही विरोध झाला की विरोधकाना रोबेन आयलंड या ठिकाणी बंदीत ठेऊन त्यांचा विरोध मोडून काढला जात असे.
गांधीजींपासून प्रेरणा घेतलेले नेल्सन मंडेला यानी पुढाकार घेउन ब्रिटीशाना उघड उघड विरोध करायला सुरुवात केली. परिणामी त्याना एकूण २७ वर्षांचा तुरुंगवास घडला. त्यांच्या सुटकेनंतर हळूहळू सत्तांतर सुरु झाले व नेल्सन मंडेला साउथ आफ़्रिकेचे पहिले अध्यक्ष झाले. मात्र गांधीजींच्या शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने त्यानी हे स्थित्यंतर रक्तरंजित होऊ दिले नाही.
मात्र स्वतःच्या फायद्यासठी का होईना ब्रिटीशानी अनेक शहरे निर्माण केली, स्वतःसाठी निराळ्या वसाहती निर्माण केल्या, मोठ्या रस्त्यानी शहरे जोडली. आधुनिक शाळा, बागा, हॉस्पिटल्स, थिएटर्स, दुकाने बांधली. पण गोर्‍या लोकांखेरीज इतराना त्यांत मज्जाव असे.मात्र साउथ अफ़्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सारे बदलले आहे व साउथ अफ़्रिकेला जगात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
जोहान्सबर्ग शहर आधुनिक साधनानी सज्ज आहे. उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांचे दुभाजक गुलाबांच्या फुलानी सजविलेले आहेत. वाहतुकीचे नियम सर्वजण पाळतात. कुठेही नळावरचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ असते. शहराची रचना सुंदर आहे. हवेचे प्रदूषण नाही. रस्त्यांच्या दोन्ही बाजूना लावलेल्या हिरव्यागार वृक्षांमुळे सारा परिसर नयनरम्य झाला आहे. सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव साधन कॉम्बी व्हॅन. आपल्याकडील बेस्ट सारख्या बसेस तुरळक प्रमाणात धावतात.घरे खूप मोठी. काळ्या बायका घरकामासाठी मिळतात. नोकरवर्ग कमी मोबदल्यात मिळतो. उत्कृष्ट भाजीपाला व फळे मुबलक मिळतात. जोहान्सबर्गचे हवामानही सुंदर आहे. उन्हाळ्यात पाउस पडतो त्यामुळे उन्हाळा सुसह्य होतो. थंडी कडक असते.
सध्याचे राज्य काळ्या लोकांचे आहे. तिथे गोरे लोक फक्त ९ टक्के आहेत. उद्योगधंदे, राजकारण यात काळे व भारतीय यांचे वर्चस्व आहे. देशाचे सरासरी जीवनमान ४० वर्षे आहे. एड्स या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे व ही मोठी चिंतेची बाब आहे.
रशिया - मुक्काम मास्को
रशिया म्हटले की आठवते झार राजांची जुलमी राजवट, लेनिन, बोल्शेविक संघटना व विशेषेकरून स्टॅलीन. दुर्दैवाने रशियाचा इतिहास रक्तरंजित आहे. धर्माच्या संकल्पनेला विरोध व सत्तेच्या विरोधकांची कत्तल यामुळे बळींची संख्या कोटीत जाते. लेनिनने KGB नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती आणि त्यामुळे जनतेला हाल सोसावे लागले. आज त्या संघटनेचे नवे नाव FSB असे आहे. पूर्वीप्रमाणे आता रशिया एकसंघ नाही व सध्याचे त्याचे चित्र खूपच निराळे आहे. महागाई फार आहे. स्त्रियाना महत्व आहेच व बरीचशी कामे त्याच करतात. बागा, जंगले, तळी खूप आहेत. लोक स्वच्छतेबद्दल बेफ़िकिर असतात पण सरकार ते काम करते. रस्ते चांगले राखले जातात. ९X९ लेनचे प्रशस्त रस्ते आहेत. रशियात साधनसंपत्ती खूप आहे. ट्राम, ट्रेन, बसेस या वाहनांमुळे सार्वजनिक वाहतूक चांगली आहे. शिवाय उत्तम भुयारी रेल्वेमार्गही आहेत. नद्या व नद्यांचे काठ सुंदर राखले आहेत. रशियामध्ये परकीयांकडे पासपोर्ट असणे अत्यावश्यक असते. लिफ़्टमध्ये गुप्तता पाळली जाते व आपल्याला बटन दाबता येत नाही. ट्रेनमधून प्रवास केला तर प्रवासी वाचनात दंग असलेले दिसतात. इतरांशी फारसे बोलत नाहीत. घरी यायचे निमंत्रण नसते. पाळीव कुत्रे सर्रास आढळतात. आंघोळीची पद्धत अभावानेच आहे. व्होडका दारू सर्रास प्याली जाते पण त्याचा वास भयानक असतो. भोजनामध्ये विविधता नाही. आर्थिक सुरक्षा नाही त्यामुळे लोक खर्चिक होतात. स्विमिंग, बॅलेट,स्केटिंग यांचे वर्ग चालतात. रशियन माणूस क्वचितच हसतो. मात्र ओळख झाल्यावर कोणतीही मदत करायला तयार असतो. अनेक पाकिस्तानी, बंगलादेशी रशियन मुलींशी लग्न करतात. शिक्षणाचे प्रमाण खूप आहे. मास्को स्टेट युनिव्हर्सिटीची ३७ मजल्यांची इमारत आहे. टूरिझम फारसे नाही. रेड स्क्वेअर येथे म्युझीयममध्ये लेनीनचे प्रेत ठेवले आहे. ६०० वर्षांचे जुने चर्च आहे. रशियन सर्कस चांगली असते. कला देशाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाते. पासपोर्ट दाखविल्याशिवाय क्रेडिट कार्डाचे पैसे काढता येत नाहीत. मात्र अमेरिकन मॅकडोनाल्ड ब्रेड तेथे मिळतो. रशियात लोकशाही नावालाच आहे. सारा कारभार सध्याचे अध्यक्ष पुतिन चालवतात. रशियामध्ये तेल व खनिज साठे भरपूर प्रमाणात असल्याने प्राप्तीचे ते मोठे स्रोत आहेत.
प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित हे भाषण खूपच माहितीपूर्ण ठरले.

Friday, June 19, 2009

अमेरिकेत




















मित्रानो, मी ५ जूनला अमेरिकेत सान-फ्रान्सिस्को जवळ सान रेमॉन गावी मुलाकडे आलो आहे. हे गाव फार मोठे नाही पण छान आहे. येथे वसंत ऋतु संपून ग्रीष्म सुरू झाला आहे तरी थोडी थंडी कालपरवांपर्यंत होती. मी राहतो आहे त्या भागात बहुतेक छोटी-मोठी स्वतंत्र घरे आहेत. प्रत्येकाच्या दोन किंवा जास्त गाड्या असतात. घराला गॅरेज असते पण गाड्या बाहेर आणि गॅरेजमध्ये अनन्वित सामान अशी परिस्थिति असते. माझा रोज फिरायला जाण्याचा कार्यक्रम असतो. सर्व घरांपुढच्या व बाजूच्या मोकळ्या जागेत अनेक फुलझाडे, वृक्ष व सुशोभीकरण केलेले असते. त्यात खूप कलात्मकता असते. सध्या फुलाना बहर असल्यामुळे फारच शोभा दिसते. मी सहज काढलेले परिसराचे काही फोटो येथे पहा.

Thursday, June 04, 2009

सौ. इंद्रायणी सावकार
काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका
एक मुलाखत
दिनांक १३ मे रोजी सौ. सुजाता जोग यानी प्रथितयश लेखिका सौ. इंद्रायणी सावकार यांची मुलाखत घेउन या उच्च विद्या विभूषित चतुरस्र लेखिकेचा वाङमयीन जीवनपट सोबती सभासदांपुढे उलगडून दाखविला.
सौ. इंद्रायणी सावकार यांची शैक्षणिक कारकीर्द दैदिप्यमान अशीच आहे. मॅट्रीकमध्ये संस्कृतची मानाची जगन्नाथ शंकरशेट व इंग्रजीची दादाभाई नौरोजी पारितोषिके त्यानी मिळविली.पुणे विद्यापीठात संस्कृत (ऑ) मिळवून त्या सर्वप्रथम आल्या. युनिव्हर्सिटी ऑफ़ पॅरीस (Sorbonne) यानी त्याना डी.लिट देऊन त्यांचा सन्मान केला. सध्या त्या दैनिक ‘सामना’च्या उपसंपादिका आहेत.
विनोदी लघुकथा लेखन त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे वैशिष्ट्य. वाङमयाचे इतर प्रकारही त्यानी यशस्वीपणे हाताळले आहेत. २० कादंबर्‍या, १६ लघुकथा संग्रह इतर मराठी-इंग्रजी वाङमयीन लिखाण याची संख्या ५० च्या वर आहे. इंग्रजी/मराठी नियतकालिकांत लिखाण, आकाशवाणीवर विविध विषयांवरील भाषणे, संस्कृत वृत्तनिवेदिका, दूरदर्शवर मराठी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन याही भूमिका त्यानी पार पाडल्या आहेत.
अनेक ऋषीमुनींच्या कथांचा समावेश असलेले ‘Stories of Sages' हे पुस्तक त्यानी परदेशस्थ भारतीय मुलांना आपल्या पौराणिक संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून लिहिले आहे व परदेशात त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
मुलाखतीत आपल्या वाङमयीन प्रवासाबद्दल बोलताना त्यानी सांगितले की समाजात अवती भवती वावरणारी माणसे व ऐकलेले अनुभव व प्रसंग यानी त्यांच्या कथा कादंबर्‍याना विषय पुरविले आहेत. प्राय: विनोदी कथाना वाचकांची पसंती मिळाल्याने त्याना अधिकाधिक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली व त्यांच्या इतर साहित्यालाही दाद मिळू लागली. त्यांच्या लेखणीने अनेक विषयात लीलया संचार केला आहे. ओळखीच्या, नात्यातल्या अनेक माणसानी त्यांच्या लिखाणाला विषय पुरविले आहेत. थोडक्यात, त्यांच्या मते डोळसपणे पाहिले, अंगी लिखाणाची आवड व कौशल्य असले तर लिहायला विषय मिळतात व वाचकांचा त्याला प्रतिसादही मिळतो. शिवाय त्या एक उत्तम गृहिणीही आहेत. शिवण, भरतकला, पाककला यातही त्या पारंगत आहेत.
सोबतीच्या काही सभासदानी विचारलेल्या प्रश्नाना त्यानी समर्पक उत्तर दिल्याने मुलाखत रंगतदार झाली.
एका उच्च विद्या विभूषित, चतुरस्र अशा या लेखिकेच्या मुलाखतीने सोबतीच्या सभासदाना त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीचे जवळून दर्शन झाले.

Wednesday, May 27, 2009

`कैलास-मानसरोवर यात्रा- एक अमृतानुभव!’









कैलास









मानसरोवर









मानसरोवर









कैलास









कैलास

कैलास-मानसरोवर यात्रा...- एक अमृतानुभव!

दिनांक १३ मे २००९ रोजी सोबतीच्या साप्ताहिक सभेमध्ये, ‘सोबती’ परिवारामध्ये नव्यानेच दाखल झालेले एक सभासद श्री. प्रभाकर ठोसर यांनी एक विशेष कार्यक्रम सादर केला-‘प्रवास वर्णनाचा’! ‘विशेष’ म्हणण्याचे कारण असे की प्रवास वर्णन प्रभावीपणॆ श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी दॄक आणि श्राव्य अशा दोन्ही माध्यमांचा सुयोग्य वापर केला.
कार्यक्रमाचे नांव होते ‘कैलास-मानसरोवर यात्रा-एक अमृतानुभव!’ या अनुभवाची ‘प्रचीति’ श्रोत्यांना आणून देत असताना, त्यांच्या ओघवत्या भाषेतील प्रवासवर्णनाबरोबच, एकीकडॆ व्यासपीठावर उभारलेल्या मोठ्या पडद्यावर प्रवासातील क्षणचित्रेही एकामागून एक झळकत होती. अशा एकूण ५८ छायाचित्रांच्या माध्यमातून श्री.ठोसर यांनी ‘कैलास-मानसरोवर’ श्रोत्यांसमोर कसे साकारले त्याचेच हे शब्दांकन !

‘कैलास-मानसरोवर यात्रा’ ही जगातील अत्यंत दुर्गम प्रदेशातील,आणि म्हणूनच अतिशय खडतर अशी यात्रा आहे. पश्चिम-तिबेट प्रांतामध्ये समुद्रसपाटीपासून २२००८ फ़ूट उंच असलेला प्रचंड हिमाच्छादित पर्वत म्हणजेच हा वेदकाळातील मेरू पर्वत.. शिवपार्वतींचे निवासस्थान कैलास पर्वत...! या महाकाय पर्वताच्या पायथ्याशी, परंतू समुद्रसपाटीपासून १५२४० फ़ूट उंचीवरील २०० चौरस मैलांच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला अथांग जलाशय म्हणजेच ‘मानसरोवर’! महाभारतात व्यासांनी वर्णिलेले ‘बिंदुसार’ म्हणजेच मानसरोवर’..!

‘कैलास-मानसरोवर’ ही ३० दिवसांची ‘पायी-तीर्थयात्रा’ भारत सरकारतर्फ़े नियमितपणे आयोजित केली जाते. खाजगी पर्यटन संस्थांच्या माध्यमातूनही मुंबईपासून १६ दिवसांची परतीची यात्रा (काठमांडू पासून जीपच्या साहाय्याने) उपलब्ध असते. यात्रेत सहभागी होण्यापूर्वी प्रवाशांना तिथल्या प्रचंड उंचीवरील विरळ हवेमुळे उद्भवणा~या शारीरिक आणि मानसिक समस्यांची पूर्णतः जाणीव करून दिली जाते व खबरदारीची उपाय योजना म्हणून योग्य त्या शारीरिक स्वास्थ्य विषयक वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या पूर्ततेनंतरच यात्रेत सहभागी करून घेतले जाते ! भारतीय प्रदेशावरून ही यात्रा नेपाळ मार्गे तिबेटमध्ये जाते. तिबेटच्या पठारी वाळवंटातून कैलासाच्या पायथ्यापर्यंतचा जीपचा प्रवासही रस्त्यातील सततच्या खाचखळग्यांमुळे अक्षरश:सर्वांग घुसळून काढणारा, हाडें खिळखिळीत करणारा आहे! भारतीय नागरिकांना नेपाळसाठी व्हिसा लागत नाही, परंतू तिबेट हे चीनच्या ताब्यात असल्यामुळे, चीनचा व्हिसा मात्र लागतो. यात्रेसाठी दरडोई सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.
अशी ही एकंदर अडथळ्यांची मालिका असूनही लोक ह्या यात्रेत स्थान मिळविण्यासाठी धडपडत असतात याचे कारण जर कांही असेल तर ते एकच आणि ते म्हणजे ‘अव्यक्ताची आंतरिक ओढ’.. बस्स!
त्या अनामिक ओढीनेच सुरु होते ही यात्रा.. दिव्यत्वाची ‘प्रचीति’ घेण्यासाठी! नेपाळ सीमेपासून जीपमधून तिबेटमध्ये प्रवेश केल्यानंतर ख~या अर्थाने यात्रा सुरू होते. या संपूर्ण प्रवासात अनंत अडचणीं आहेत, शरीर गोठवून टाकणारे थंडगार बोचरे वारे आहेत, दाहक उन्हाचा तापही आहे, पण त्या पार करून तुम्ही येथपर्यंत,एवढ्या उंचीवर आलांत की मग मात्र.. "अरे?, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो याहून वेगळा काय असणार आहे..? हाच स्वर्ग आहे !" असे म्ह्टल्यावाचून राहवत नाही. कारण संपूर्ण कैलास-मानस परिसर हा ‘केवळ एकमेवाद्वितीय’ अशा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कैलास पर्वतावर प्रत्यक्ष कोणीही जाऊ शकत नाही. त्याचे दूरवरून कडेकडेने दर्शन घेत त्याला प्रदक्षिणा घालावी लागते. संपूर्ण कैलास परिक्रमा तीन दिवसांची असते. ती पायी, याकवर अथवा खेचरावर बसूनच पुरी करावी लागते.परिक्रमेतील हा प्रवास अतिशय खडतर व दमछाक करणारा आहे. परंतू येथे गूढ संवेदना जाणवते,संचारते, व तीच शरीर पुढे ढकलते असा दैवी भास होतो. हा अद्भुतरम्य गिरिराज पूर्व दिशेकडून पाहिले असतां स्पटिकासारखा शुभ्र-स्वच्छ, तर पश्चिमेकडून माणिकासारखा लाल, दक्षिणेकडून नीलमण्यासारखा तेजस्वी, तर उत्तर दिशेकडून सुवर्णराशीसारखा झळाळत असताना पाहून डोळ्यांचे पारणे फ़िटते. कैलास पर्वताच्याच शिखरावरून अवतरते ती पवित्र गंगा नदी ! महर्षि वेदव्यास, भृगु, वसिष्ठ, पराशर आदि देवर्षींच्या तप:साधनेने पावन झालेल्या या पुण्यभूमीत पाऊल टाकल्यानंतर, एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणॆ भासणा~या कैलास-पर्वताचे दर्शन होताच, तात्काळ गळून पडतात त्या बेगडी मानवी प्रतिष्ठा.. ! जळून जातात दंभ-अहंकाराच्या भ्रामक कल्पना..! विरून जाते ‘स्वत्त्वाची जाणीव’..! नतमस्तक होतो आपणा त्या कैलासरूपी भगवद्दर्शनाने, हात नकळत जोडले जातात आणि ओठांतून शब्द येतात....
कैलासराणा शिवचंद्रमौळी, फ़णिंद्र माथा भृकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधो भवदु:ख हारी, तुजवीण शंभो,मज कोण तारी..!
आपण उभे असतो एका विस्तीर्ण ,सुमारे २०० चौरस मैलांच्या भूप्रदेशावर, समुद्रसपाटीपासून १५००० फ़ूट उंचीवर! समोर महकाय कैलास पर्वत,आणि त्याच्या पायथ्याशी विसावलेला अतिविशाल जलनिधी- हेच ते मानसरोवर ! कैलास पर्वतावरचे बर्फ़ वितळून त्याचे पाणी मानसरोवरामध्ये येते. हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठून त्याचे तपमान -५०अंश इतके खाली येते! सभोवताली सर्वदूर, अतुलनीय..अनुपम सृष्टीसौंदर्य, बर्फ़ाच्छादित गिरिशिखरे, वर आकाशात सूर्यकिरणांची सप्तरंगी उधळण, हे सर्व पाहिले की वाटते "खरंच, हे जग किती सुंदर आहे..!

श्री.ठोसर यांनी सुमारे दीडतासात अशी ‘पुण्ययात्रा’ घडविल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सोबतीचेच सभासद श्री. विश्वास गोरे व श्री.त्रिविक्रम जोगळेकर यांनी सुद्धा, ते ‘मानसरोवर’ यात्रेला गेले होते त्या वेळचे अनुभव सांगितले. एकंदर सर्वच कार्यक्रम श्रोत्यांना खूप आवडला.

Wednesday, May 20, 2009

घडविले त्यानी ‘जीवन’

घडविले त्यानी ‘जीवन ’
एक मुलाखत
प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेले जीवन जगतच असतो. पण काहीजण मात्र जीवन घडवतात. याचे एक उदाहरण म्हणजे विले पार्ले (पू) स्टेशनजवळील ‘जीवन रेस्टॉरंट’ चे मालक श्री. वासुदेव विठ्ठल जोगळेकर. पण सारे परिचित त्याना आपुलकीने आप्पा म्हणतात. आजचे ‘जीवन रेस्टॉरंट’ त्यानी उभे केले, जिद्दीने, अपार कष्टाने, प्रामाणिकपणे आणि नेकीने. मराठी माणसाने धंदा सुरु केला म्हणजे तो धंद्यात पडला असे म्हटले जाते. पण आप्पानी या धंद्यात प्रवेश केला आणि आज ते यशस्वीपणे आपल्या व्यवसायात ठामपणे उभे आहेत. गेली पंचावन वर्षे ‘जीवन’ खवय्यांचे आश्रयस्थान झाले आहे. या यशस्वी व्यावसायिकाची मुलाखत सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. शंकरराव लिमये यानी घेतली. त्यावर आधारित खालील वृत्तांत.
आप्पांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा. त्याना दोन भाउ व तीन बहिणी. वडील शेतकरी. दुर्दैवाने आप्पा पाच वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरवले. भाता शिवाय उत्पन्न नाही. मग सार्‍या भावानी मुंबईची वाट धरली. विवाहित बहिणीचा आधार होता. दोन मोठे भाउ सरकारी नोकरीला लागले. आप्पा गिरगावातल्या हायस्कूलमध्ये शिकले. मात्र नोकरीच्या मागे न लागता काही व्यवसाय करावा हा त्यांचा ठाम विचार होता. पण व्यवसाय म्हटला की त्याला थोडेफार भांडवल हवे. सरकारी नोकरदार भावांची मदत मर्यादित होती. मग आप्पानी थोडे दिवस पार्ल्यातील साठे यांच्या सुप्रसिद्ध विजय स्टोअर्स
मध्ये नोकरी धरली व तिथे काट्यापासून गल्ल्यापर्यंत सर्व कामे केली. नकळतपणे व्यवसायातील अनेक पैलूंचा अनुभव त्याना मिळाला. मात्र व्यवसाय कोणता करावा हे नक्की झाले नव्हते.एके दिवशी त्याना कळले की पार्ले स्टेशनजवळ एक हॉटेल विकायचे होते. मामांच्या मदतीने ते हॉटेल विकत घेण्याचे धाडस त्यानी केले. पहिली दोन वर्षे हॉटेल तोट्यात गेले पण आप्पानी धीर सोडला नाही. उलट तोटा झाला तरी हॉटेल व्यवसायातील खाचाखोचा त्याना समजल्या आणि आवश्यक त्या बदलासह हॉटेल चांगले चालू लागले.सुरुवातीच्या २० बाय १० च्या जागेत सुरु झालेले आता ‘हॉटेल जीवन’ ४००० चौ.फूट जागेत दिमाखाने उभे आहे. वास्तविक शेजारीच ‘रामकृष्ण’ हे हॉटेल होते. त्यामुळे स्पर्धा अपरिहार्य होती. पण हॉटेल व्यवसायात काळाप्रमाणे बदलावेच लागते. त्यानुसार बदल करून शेजारी प्रस्थापित हॉटेल असूनही ‘जीवन’ ला गिर्‍हाईक मिळू लागले. मराठी पद्धतीच्या पदार्थांबरोबरच लोकांच्या बदलत्या चवीप्रमाणे दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज पद्धतीचे पदार्थही जीवनमध्ये मिळू लागले. मग ‘जीवन’ ने मागे वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे आप्पांचे शेजारच्या ‘रामकृष्ण’ हॉटेलच्या मालकाशी उत्तम संबंध आहेत. व्यवसायामुळे आर्थिक सुस्थिती आली तरी आप्पांची सामाजिक दृष्टी हरवली नाही. बाबुराव परांजपे यांच्या स्मरणार्थ रोगनिदान केंद्र म.न.पा.च्या मोकळ्या प्लॉटवर उभे करण्याचा संकल्प संबंधितानी सोडला होता. परंतु सदर प्लॉट म.न.पा. हस्तांतरित करीत नव्हती. आप्पानी आपले वजन खर्च करून तो प्लॉट रोगनिदान केंद्रासाठी मिळवून दिला व एक सामाजिक उपक्रम म्हणून हे अद्ययावत रोगनिदान केंद्र कार्यान्वित झाले आहे. पार्ल्यातील एक प्रसिद्ध कॅटरर कै. बापू पंडित हे आप्पांचे परिचित होते. ते एक सामाजिक दृष्टी असलेले दानशूर गृहस्थ. प्राप्तीतला बराचसा वाटा ते उदारहस्ते अनेक संस्थाना देत.वयापरत्वे त्यानी व्यवसाय बंद करण्याचे ठरविले. पण स्वस्थ बसणे बापूंच्या स्वभावात नव्हते. मग त्यानी वृद्धाश्रम काढण्याचा निर्णय घेतला. प्रथम जमीन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजल्यावर वृद्धाश्रम उभा करण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता होती. म्हणून बापूनी पार्ल्यातील अनेक परिचितांकडून मुदत ठेवीवर व्याजाने पैसे घेतले व अखेर वृद्धाश्रम चालू झाला. आप्पानी वृद्धाश्रमाच्या उभारणीत आपला वाटा उचललाच व शिवाय मुदत ठेवी परत करण्यासंबंधी अडचण निर्माण झाली असता आप्पानी ही जबाबदारी पत्करली व आवश्यक त्या पैशांची तरतूद करून सर्व ठेवी व्याजासह परत केल्या. बापू पंडितानी त्याना वृद्धाश्रमाचे विश्वस्त म्हणून नेमले. मध्यंतरी दोन वर्षांपूर्वी बापूंचे निधन झाले. परंतु आप्पांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने वृद्धाश्रम व्यवस्थित चालू आहे. विशेष म्हणजे काही ठेवीदारानी आपल्या ठेवी वृद्धाश्रमाला देणगी म्हणून दिल्या. आप्पांचा मुलगा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक्स) असूनही नोकरी न करता आप्पांच्या बरोबरीने व्यवसायात आपले योगदान देत आहे. हॉटेलव्यतिरिक्त त्यांचा कॅटरिंगचाही व्यवसाय आहे. जीवन उपहारगृह सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत उघडे असते. नोकरवर्ग दोन पाळ्यांमधे काम करतो. आप्पांचे नोकरांशी सौहार्दाचे संबध आहेत.
अनेक सामाजिक संस्थाना त्यानी मदतीचा हात दिला आहे. टिळक विद्यालयाला त्यांचे भरीव सहाय्य झाले आहे.
त्यानी सांगितले की हॉटेल व्यवसाय फायद्याचा असला तरी कमीत कमी बारा तास काम करणे आवश्यक असते. हा व्यवसाय मेहेनतीचा आहे आणि अथक मेहनत करणारा यात यशस्वी होऊ शकतो.समारोपाच्या वेळी त्यानी ‘सोबती’ला देणगीही दिली. शिवाय सर्व उपस्थित सोबती सभासदाना चविष्ट अल्पोपहार दिला. या मुलाखतीद्वारे श्री. आप्पा जोगळेकर या यशस्वी उद्योजकाचे आणि त्यांच्यातल्या माणसाचे ‘जीवन’ दर्शन झाले.

Tuesday, May 19, 2009

ऑरोरा बोरिआलिस










मागे आपण रंगीत हिमनग पाहिलेत. आज जे फोटो आपल्याला दिसताहेत ते आकाशांतील रंग आहेत. यांना ऑरोरा बॉरिआलिस असें म्हणतात. आकाशाच्या उत्तरध्रुवाजवळच्या भागांत कित्येक दिवसांची दीर्घ रात्र चालू असताना सूर्य क्षितिजाच्या खालीं असताना हे दिसतात. अजब आहे ना निसर्गाचे रंगकाम?

Monday, May 11, 2009

न्याय वैद्यक शास्त्र (Forensic Medicine)

न्याय वैद्यक शास्त्र हे वैद्यक शास्त्राचे महत्वाचे अंग आहे. या क्षेत्रात तज्ञ डॉक्टर्स फारच कमी आहेत कारण त्याचे स्वरूप व्यवसायापेक्षा संशोधनाचे आहे. दिनांक ८ एप्रील रोजी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विदुषी डॉ.सौ. वसुधा आपटे यांचे न्याय वैद्यक शास्त्र या विषयावर उद्-बोधक व्याख्यान झाले.
नैसर्गिक मृत्युसंबंधी कोणतेही कायदेशीर प्रश्न निर्माण होत नाहीत. मात्र अपघात, खून किंवा तत्सम अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यूच्या बाबतीत मात्र, मृत्यु अपघात किंवा खून इ. कारणाने झाला असेल तर न्यायवैद्यक शास्त्राची मदत उपयुक्त ठरते. रक्त, हाडे, केस, विस्केरा इ. अवयवांचे शास्त्रोक्त रीत्या तपास करून मृत्यूचे कारण निश्चित करता येते व त्यामागे खुनासारखे गंभीर प्रकरण असेल तर गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी या शास्त्राचा फारच उपयोग होतो. त्यामुळे शासनाने न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळा अनेक ठिकाणी स्थापन केल्या आहेत. डॉ.सौ.आपटे यांचे या बाबतीतील योगदान प्रसंशनीय आहे. त्या एम.डी. आहेतच व शिवाय एल.एल.बी. ही कायद्याची पदवीही त्यानी घेतल्यामुळे अनेक प्रकरणात कायदेशीर पैलूही त्याना तपासता येतात. कायद्याची पदवी घेतलेले डॉक्टर्स भारतात फारच थोडे आहेत. गुन्हेगारीसंबंधी न्यायालयीन प्रकरणात त्याना तज्ञ म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावले जाते.डॉ.सौ. आपटे यानी या शास्त्रासंबंधी विपुल लिखाण केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन यावरही त्यांचे माहितीपूर्ण कार्यक्रम झाले आहेत. नोकरीच्या काळात इंग्रजीत लेखन केल्यावर निवृत्तीनंतर त्यानी मराठीत न्यायवैद्यक शास्त्रावर १३१ लेखांची मालिका पूर्ण केली. शिवाय कवितालेखन, गायन, पाककला इत्यादीतही त्याना रस आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली गेली आहे व त्यासाठी त्याना एकूण चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्र मेडीको लिगल असोसीएशन व इंडीयन ऍकॅडमी ऑफ़ फ़ोरेन्सिक मेडीसीन या संस्थांच्या अध्यक्षपदांवर त्यांची निवड झाली ही त्यांच्या ज्ञानाची पावतीच म्हटली पाहीजे. वैद्यक शास्त्राच्या एका महत्वाच्या पैलूची सोबती सभासदाना माहिती झाली. सभासदांच्या अनेक प्रश्नाना त्यानी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे हा कार्यक्रम उद्-बोधक ठरला.