Monday, November 23, 2009

मॅग्लेव्ह ट्रेन

कांही देशांत, विद्युत-चुंबकांचा वापर करून अतिशय जलद धांवणार्‍या म्हणजे मॅग्लेव्ह ट्रेनचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. जर्मनी, जपान व अमेरिका हे ते देश. मॅग्लेव्ह हे मॅग्नेटिक (चुंबकीय) लेव्हिटेशन (तरंगणे) चे संक्षिप्त रुप. ’गाइडवे’ मधे असलेल्या चुंबकीय क्षेत्र निर्माण करणार्‍या जाळ्या, धाव-मार्गावर असलेले चुंबक व ट्रेनच्या ’अंडर-कॅरेज’ला असणारे चुंबक यांत पाहिजे तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे व त्यांत बदल करणे, सजातीय चुंबकांचे एकमेकांना दूर सारणे व विजातीय चुंबकांतील आकर्षण याचा उपयोग करून ट्रेन धावपट्टीवर १ ते १० सेंटीमिटर उंचीवर तरंगत ठेवता येते व घर्षणरहित अशा या प्रणालीत, अभुतपूर्व म्हणजे ५०० किलोमिटर प्रती तास, या गतीने पळविता येते. सुटल्यापासून पहिल्या २ मिनिटांतच ती ३०० किलोमिटरची गती गांठते.
जर्मनीत जवळ जवळ ३ दशकांपूर्वी या तंत्रज्ञानाचा उदय झाला.अतिशय किचकट व खर्चिक तंत्रज्ञान लागणारी व व्यापारी तत्वावर असलेली ३० किलोमिटर लांबीची मॅग्लेव्ह जगांत आज फक्त चीनमधील शांघायमधेच आहे व ती लॉंगियांग रोड स्टेशन ते पुडॉंग एअरपोर्ट पर्यंतचा पल्ला १० मिनिटांपेक्षाही कमी वेळांत गांठते. तिचा हॅंगझाउ पर्यंत १६० किलोमिटरचा विस्तार २०१० पर्यंत पूर्ण होईल.
पंख नाहित, तरंगत ठेवल्यामुळे घर्षणाचा अभाव व त्यामुळे ध्वनीप्रदुषण जवळ जवळ नाहीच, एंजीन नाही, पोल्युशन नाही, एग्झॉस्ट गॅस नाही. अशी ही ट्रेन … एक चमत्कारच !




टीकाकार म्हणतात की अतिशय खर्चिक अशा मॅग्लेव्हमधे गुंतवणुक करण्याचे कारणच काय? त्यांना त्यांतील thrill व्यतिरिक्त आणखी एका गोष्टीचा विसर पडतो. केवळ ’अ’ पासून ’ब’ पर्यंत जाता येणे एवढेच नव्हे तर ही भूतकाळांतून दैदिप्यमान भविष्याकडे मारलेली एक भरारीच आहे.
ज्या जर्मनींत या तंत्रज्ञानाचा उदय झाला तेथेसुद्धा, आपल्याकडे मॅग्लेव्ह असावी असे, त्याला लागणार्‍या अवाढव्य खर्चामुळे, वाटत नाही.
मी शांघाय पाहिले आहे. मला एक प्रश्न भेडसावतो. आपल्या मुंबईचे शांघाय केव्हा होणार? आणि त्याचे उत्तरही मला माहित आहे. शांघाय व मुंबई या शहरांचा सर्वच दृष्टीकोनांतून विचार करता, उत्तर निश्चित आहे व ते हे, “केव्हाच नाही।”
(सौजन्य गूगल )

No comments: