Saturday, March 13, 2010

सुनहरी यादें








तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ‘सुनहरी यादें’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असे. आतापर्यंत या वाद्यवृंदाचे ४५०० च्या वर कार्यक्रम झाले आहेत. यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येईल. या वाद्यवृंदाच्या प्रवर्तक व संचालिका आहेत श्रीमती प्रमिला दातार. शास्त्रीय/उपशास्त्रीय पद्धतीवर आधारित गीते, नाट्यगीते व लोकप्रिय हिंदी गीते अशा विविवधेतेमुळे ‘सुनहरी यादें’ हा कार्यक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत गेल

अशा या चतुरस्र गायिकेची मुलाखत दि.१० फ़ेब्रुवारी रोजी सोबतीचे उपाध्यक्ष श्री. सुरेश निमकर यानी घेतली. विशेष म्हणजे गिरगावातील हिंद हायस्कूलमध्ये प्रमिला दातार या श्री.निमकर यांच्या सहाध्यायी होत्या. त्यामुळे सोबतीमध्ये मुलाखतीसाठी येण्याचे निमंत्रण त्यानी आनंदाने स्वीकारले.

जुन्या आठवणीना उजाळा देत श्रीमती दातार यानी संगीत साधनेमध्ये कशी प्रगती झाली हे विस्ताराने सांगितले.वास्तविक प्रमिलाताईंचे वडील शिस्तप्रिय होते. परंतु प्रमिलाताईंची संगीतातील प्रगती पाहून वडिलानी त्यांच्या संगीत साधनेला उत्तेजन दिले. श्री निमकर यांच्या अनेक प्रश्नाना त्यानी मनमोकळेपणे उत्तरे दिली.

चांगल्या आवाजाची देणगी लाभल्यामुळे शालेय जीवनात त्यानी अनेक संगीत नाटके व गायनाच्या कार्यक्रमांत भाग घेतला. शालेय शिक्षणानंतर संगीताची जोपासना करण्यासाठी त्यानी एस.एन.डी.टी. विद्यालयात प्रवेश घेतला. एम.ए. पर्यंतचे सारे संगीताचे शिक्षण त्यानी या विद्यालयात पुरे केले. नंतर त्यानी ‘सुनहरी यादें’ या वाद्यवृंदाची स्थापना केली व उत्तरोत्तर कार्यक्रम लोकप्रिय होत गेला. सुरेल आवाजाची देणगी व संगीताचे सखोल ज्ञान लाभल्याने त्या हिंदी गाणीही ताकदीचे गाउ लागल्या. सुप्रसिद्ध गायक तलत महमूद यांच्याबरोबर त्यानी परदेशात अनेक यशस्वी दौरे केले . प्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांच्या गीतगोपाळ या कार्यक्रमात त्यानी अनेक गाणी गायली. सी.रामचंद्र याचे ‘शोला जो भडके’ हे अजूनही लोकप्रिय असलेले गाणे त्यानी गाउन श्रोत्यांची वाहवा मिळवली. तसेच आघाडीचे संगीतकार वसंत देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली त्यानी अनेक हिंदी/मराठी गाणी गायली. त्यांच्या आवाजातील गोडवा व जोश अजूनही टिकून असल्याचा श्रोत्याना प्रत्यय आला.

नंतर सदाबहार ‘दिलके अरमा बह गये आसुओमे’ व ‘कभी तहनाइयोमे हमारी याद आयेगी’ ही भावपूर्ण गाणी सादर करून ‘सुनहरी यादें’ पुन्हा जागृत केली. त्यांच्या आवाजातील गोडवा व ढंग इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. विशेष म्हणजे अजूनही त्या शास्त्रीय संगीताचे धडे सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर यांचेकडे घेत आहेत.

शेवटी श्रोत्यांच्या आग्रहास्तव ‘माझ्या नवर्‍यान सोडलिया दारू’ व ‘पाडाला पिकलाय आंबा’ या लावण्या त्यानी नेहमीच्या ढंगदार रीतीने सादर केल्या.

श्रीमती दातार याना अजूनही अनेक कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येतात यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येईल. ज्येष्ठ नागरिकांची संघटना ‘सोबती’’ साठी केलेल्या या कार्यक्रमासाठी त्यानी कोणतेही मानधन घेतले नाही हे विशेषत्वाने नमूद करायला हवे.

आभार प्रदर्शनानंतर हा संगीतमय कार्यक्रम समाप्त झाला.

No comments: