Sunday, March 28, 2010

आनंद मेळावा सहल

ही सहल होते की नाही असे वाटत होते. सुरुवातीला दोन दिवसांच्या सहलीसाठी सुचविलेल्या ठिकाणाला सभासदांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र काही सभासदानी हा अनेक वर्षांपासून चालत आलेला उपक्रम बंद करु नये असे मत
आग्रहाने प्रकट केले. नंतर अनेक सभासदानी एक दिवसाच्या सहलीसाठी उत्साह दाखविला आणि दि.२५ फ़ेब्रुवारी रोजी ३६ ज्येष्ठ नागरिक सहलीत सामील झाले. विशेष म्हणजे त्यापैकी २० महिला होत्या.

सहलीचे ठिकाण होते परमार रिसॉर्ट, वज्रेश्वरी रोड. तेथे बसने ९ वाजता पोहोचलो. लगेच सर्वजण रुचकर नाश्त्यावर तुटून पडले. नंतर काही जण फेरफटका मारायला गेले, काहीनी पर्जन्यनृत्याचा (rain dance) चा आनंद घेतला तर काहीनी पोहोण्याचा. नंतर गुजराथी पद्धतीच्या चवदार भोजनावर सर्वनी यथेच्छ ताव मारला.

थोडा वेळ विश्रांती व गप्पाटप्पा झाल्यावर सर्वजण एका मोठ्या उंबराच्या झाडाखाली जमले. मोठ्या रुंद पारावर काही खाटा व खुर्च्या टाकल्या. मग खेळ रंगले. गाणी, कविता, चुटके यानी कार्यक्रम सजला. निसर्गाच्या सान्निध्यात, थंड वाहणारा वारा यामुळे उन्हाळा जाणवला नाही. चहापान झाल्यानंतर काहीजण परत एकदा लहान मुलांच्या उत्सुकतेने बैलगाडीतून आणि उंटाच्या गाडीतून फेरफटका मारून आले.

संध्याकाळी ६.४५ वाजता बस परतीच्या प्रवासाला लागली. मग सुरु झाली अंताक्षरी. नवी जुनी हिंदी-मराठी गाणी, श्लोक, आरत्या, अभंग इ. जेव्हढ म्हणून येत होत तेव्हढ म्हणून झाल. यात वेळ इतका मजेत गेला की बस कधी विले पार्ल्याला आली ते कळलेच नाही.

असा हा सहलीचा दिवस ज्येष्ठ नागरिकांना ताजातवाना करुन गेला.

No comments: