Friday, October 30, 2009

वसईचा किल्ला ... भग्न अवशेष

पश्चिमेकडील तट, ज्या बाजूने वसई गांवाकडे जाता येते. ह्या तटाची रुंदी जवळ जवळ ३० फुट आहे. दोन रुंद दगडी भिंतींच्या मद्ध्ये दगड, माती वगैरे भरून हा तट बांधला आहे. ह्या तटाचा कांही भाग तोडून, आता किल्ल्यात जाण्याचा रस्ता तयार केला आहे.
दुरून दिसणारा एक पडका बुरूज.
आणखी एक भग्न अवशेष.
किल्ल्यांतील या मंदिराचा उपयोग हिंदू मरणोत्तर विधींकरिता करतात.
भग्नावस्थेत असलेल्या अनेक वास्तू.
पुरातत्वविभागाची हल्लीच बांधलेली वास्तू. अर्थांत, ही इमारत सुस्थितिंत असणारच !
चर्चची भग्न वास्तू. पुरातत्व विभागाकडून (A। S. I.) सद्ध्या याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.
पूर्वेकडील दरवाजा. या बाजूने दक्षिणेकडील खाडीकडे जाता येते।
पूर्वेकडील तटबंदी. याच्या दक्षिणेला वसईची खाडी आहे।
चिमाजी आप्पांचे स्मारक. चिमाजी आप्पांनी हा किल्ला पोर्च्युगिजांपासून अत्यंत अवघड अशा उत्तर बाजूने हल्ला करून जिंकून घेतला. किल्ल्याला एका बाजूने खाडी, दोन बाजूंनी बिकट दलदल व चौथ्या बाजूला वसई गांव, जेथला किल्ल्याचा तट ३० फुट रुंदीचा आहे.
किल्ल्यांतून फेरफटका मारल्यानंतर, मन विषण्ण होते. भारतांत ह्या व अशा अनेक वास्तूंची जपणूक होत नाही व प्रत्यही त्यांचा ह्रास होतो आहे.









Wednesday, October 28, 2009

विचार करा - एक विरोधाभास

होमियोपॅथीमधील एक विरोधाभास
होमियोपॅथीच्या तत्वाप्रमाणे, औषध जेव्हढे विरल ( dilute ) कराल, तेव्हढे ते अधिक परिणामकारक (potent ) होत जाते. आता गंमत काय होते … कोणतेही द्रावण ( solution ) एका मर्यादेपलीकडे विरल करता येत नाही. कसे ते पहा … एक होमियोपॅथीच्या मात्रेमध्ये, जे संयुग, गुण आणते, त्याची संख्या अमुक आहे असे समजा. विरल करता करता, एक अशी स्थिती येते की जेव्हा, त्या मात्रेमध्ये, संख्येने केवळ एकच संयुग उरते. होमियोपॅथिचा समज जर ग्राह्य धरला, तर ही मात्रा त्या औषधाची सर्वांत प्रभावी मात्रा असायला हवी. ही मात्रा जर आणखी, समजा दुपटीने विरल करण्याचा प्रयत्न केला, तर एका मात्रेत, संख्येने एकच संयुग राहील तर दुसर्‍या मात्रेत एकही संयुग राहाणार नाही. संख्येने एक असलेल्या संयुगाची (molecule ) आणखी विभागणी होऊ शकत नाही. त्याचे विघटण अणुंमध्ये होऊ शकते. व अणुंमध्ये मूळ संयुगाचे गुणधर्म नसतात. तसेच, एखाद्या मात्रेमधील संयुगांची संख्या मोजणे हे जवळ जवळ अशक्यप्राय आहे. आता बोला .....

अमेरिकेतील फॉल सीझन

अमेरिकेच्या बर्‍याच भागांत सद्ध्या फॉल सीझन चालू आहे. Summer संपून Winter सुरू होण्याचा संधिकाल म्हणजे फॉल सीझन. या काळामध्ये झाडांच्या पानांची झड होते. बहुतेक झाडे पूर्णपणे निष्पर्ण होतात. मात्र पाने गळून पडण्यापूर्वीं हिरव्या रंगा ऐवजी त्यांचेवर अनेक विलोभनीय रंग चढतात. निसर्गाचा हा रंगांचा खेळ मन मोहून टाकणारा असतो. निरनिराळे रंग उधळणारीं झाडे पहाण्यासाठी माणसे हौसेने रानावनात फिरतात, फोटो काढतात. आणि इतराना पाठवतात. असेच आमच्या नात्यातील कोलंबसमध्ये असलेल्या संदीप बापत व गौरी बापट (लिमये) या हौशी व्यक्तींकडून माझ्याकडे आलेले काही फोटो त्यांच्या परवानगीने आपल्यासमोर ठेवतो आहे.






















Tuesday, October 27, 2009

एक दिवसाच्या सहलीकरिता वसईला भेट हा एक चांगला पर्याय आहे

पहाटे आणि सायंकाळीं येथे फिरायला येणार्‍यांची संख्या कमी नाही. हा समुद्राचा भाग डुंबण्याकरिता सुरक्षित आहे. उधाण नसलेल्या वेळी समुद्रावर वाळूवरून दूरवर चालत जाता येते.
वीस रुपयांत घोड्यावरून किनार्‍यावर फेरी मारता येते.

माणशी दहा रुपयांत किनार्‍यावर घोडागाडींतून रपेटही मारता येते.


सुरू व समुद्र यांच्या सानिध्यात भेळवाला का नसावा ?


समुद्राच्या लाटांनी किनार्‍याची धूप चालू आहे. त्यामुळे सुरुची बरीच झाडे उन्मळून पडलेली दिसतात.




किनार्‍यावर पोहोचल्यावर सुरूचे प्रेक्षणीय बन दिसते. महाराष्ट्रात, उत्तरेला बोर्डीपासून दक्षिणेला [ मुंबई वगळता] बांद्यापर्यंत, बहुतेक सर्वत्र, किनार्‍यावर सुरूची बने दिसतात.
सुरूच्या बागेकडे जाणार्‍या रस्त्यावर खूप झुडुपे व टिवरीची झाडे आहेत. सध्या फुलपांखरांच्या विणीचा हंगाम आहे. झुडुपांवर खूपशी फुलपांखरे पहावयास मिळतात. टिवरींवर छोट्या समुद्रपक्ष्यांची किलबिल ऐकू येते. पण फारशे पहावयास मिळत नाहीत. दडून असतात.
एक दिवसाच्या सहलीकरिता वसईला भेट हा एक छान पर्याय आहे.
पार्ल्याहून लोहमार्गाने वसई गांवांत साधारणत: एक तासांत पोहोचता येते. तर रस्त्याने दीड तासांत.
वसईचा किल्ला [ हा वसई खाडीवर आहे ], समुद्रकिनारा, भुइगांवचा स्वामी समर्थ मठ, निर्मळ [ दक्षिण काशी ] येथील शंकर मंदीर, गिरीजच्या हिरा डोंगरीवरील दत्त मंदीर, नायगांव [ कोळीवाडा ] येथील वाल्मिकी मंदीर, खोचिवडे [ कोळीवाडा ] येथील मंदीर, ख्रिश्चन चर्चेस ही स्थाने पहाण्याजोगी आहेत. गांवांतून आंतल्या रस्त्याने फेरफटका मारताना वाटेतील छोटेखानी बंगले व सभोवतालच्या लहानमोठ्या बागा पहाणे हा एक सुखावह अनुभव आहे.
समुद्रकिनार्‍यावर सुरूच्या झाडांची लागवड आहे. या भागाला सुरूची बाग असेच म्हणतात. वाहन एक ठरावीक अंतरापर्यंत जाते. पुढे सुमारे एक कि. मि. चालावे लागते.
देव तारी त्याला कोण मारी !


ही म्हण अनेक वेळा खरी ठरते.

ही घटना आहे मुंबईत घडलेली. मुंबईतल्या कालीना भागात एका व्हिडीयो पार्लरचा मालक मित्राशी बोलत असताना अचानक बाईकवर आलेल्या दोघानी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या पोटाच्या दिशेने गेली आणि दुसरी थेट छातीकडे. पण त्याचे सुदैव असे की छातीवर झाडली गेलेली गोळी त्याला मारू शकली नाही कारण ती गोळी त्याच्या खिशात असलेल्या पांच रुपयांच्या नाण्यावर अदळली. नाण्याचा चेंदामेंदा झाला आणि गोळी निष्प्रभ ठरली. म्हणजे काही लाखो रुपयांचे मोलही एकाद्याचे प्राण वाचवू शकत नाही ते काम एका पांच रुपयांच्या नाण्याने केले. ते नाणे जीवरक्षक ठरले.

गंमतीची गोष्ट अशी की त्याच्या शर्टच्या खिशात नाण्यानी भरलेली पर्स ठेवण्याच्या सवय़ीबद्दल त्याचे कुटुंबीय त्याची नेहमी थट्टा करीत. पण ती सवयच त्याची तारणहार ठरली.

देव तारी त्याला कोण मारी हे खरे !

Monday, October 26, 2009

हे कस ?


अनुभव असूनही डॉक्टर प्रॅक्टीस करतात.
संगणक बंद करण्यासाठी ‘स्टार्ट’ वर क्लीक करावे लागते.
जंगलमॅन असूनही टारझनला दाढी नाही.
प्रकाशाचा वेग मोजता येतो पण अंधाराचा ?
इमारत पूर्ण होऊनही तिला बिल्डिंग म्हणतात.
गिफ़्ट हे फ़्री च असताना फ़्री गिफ़्ट म्हटले जाते.
एकाद्याच्या (उदा.) चार मुलांचा उल्लेख करताना त्याना दोन मुली
व दोन मुले (मुलगे) असे अनेक ठिकाणी लिहिले जाते.

म्हणजे अर्थात रुढी गरीयसी हेच खरे

Sunday, October 25, 2009

आपले कुटुंब पहिले ... वनस्पती विश्वांतही ...

आपल्या कुटुंबांतील व्यक्तींविषयी आस्था ठेवणे व सुखदु:खे वाटून घेणे या भावना मानव व प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींतही असतात. हर्ष बैस व त्यांचे सहकारी यांनी डेलावेअर विश्वविद्यालयांत केलेल्या संशोधनांत हे दिसून आले आहे. ‘पाण्यापेक्षा रक्ताची घनता जास्त – blood is thicker than water ’ हे वनस्पतींतही खरे आहे. बैसनी ३००० पेक्षा जास्त वनस्पतींचा अभ्यास ३ वर्षे केला. ’अरॅबिडॉप्सिस थॅलियाना ’ या मोहरीवर्गातील वनस्पतींत असे दिसले की एकाच ’आई ’ पासून उगवलेल्या रोपांत व त्यांच्या आईत जी चढाओढ दिसत नाही ती दुसर्‍या ’आयांपासून झालेल्या रोपांत मात्र दिसते. एखादे रोप आपला भाऊ वा बहीण कसे ओळखते ? त्यांच्या मुळांतून जो द्रव पाझरतो त्या द्वारे ही ओळख होते. जेव्हा एखाद्या रोपाला शेजारील रोप आपल्या कुटुंबातील नाही हे कळते तेव्हा ते जास्त मुळांची निर्मिती करून, जमिनींतील पोषक द्रव्ये व पाणी चढाओढीने ओढून घेण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याच ’बंधु- भगिनी’ आसपास असताना असे होत नाही. मुळांचा श्राव निर्माण होण्याची क्षमता नष्ट होईल अशा रसायनाचा बैस यांनी रोपांवर प्रयोग केला तेव्हा असे दिसले की त्या रोपांनी आपल्या कुटुंबाची ओळख होण्याची क्षमतासुद्धा गमावली.
[ साइरा कुरुप यांच्या टाइम्स ऑफ इंडियातील लेखांतून ]

Friday, October 23, 2009

एक सुरिली मैफ़ल

एक सुरिली मैफल

श्री. अरविंद वाकणकर, एक प्रतिथयश गायक. गायकीचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. शास्त्रीय गाण्याचे शिक्षण घेउन त्यानी गायकीला सुरुवात केली व आकाशवाणी, दूरदर्शन आणि अनेक ठिकाणी त्याना अनेक सन्मान प्राप्त झाले. सध्या ते सोबतीचे कार्यवाह म्हणूनही जबाबदारी संभाळीत आहेत. बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी त्यानी खास सोबती सभासदांसाठी गायनाचा कार्यक्रम केला.

श्री वाकणकर यांची ओळख एक लेखक, कवि, मार्गदर्शक अशीही आहे. त्यानी अनेक गीते/अभंग यांची स्वत: रचना केली आहे. या कार्यक्रमात त्यानी विविध प्रकारची गीते, भक्तीगीते, अभंग, नाट्यगीते सादर केली व सादरीकरणातील विविधतेमुळे कार्यक्रम अधिकच श्रवणीय झाला.

सुरुवातीला त्यानी ‘श्याम नही आयो रे’ ही चीज सादर केली. त्यानंतर ‘रागिणी मुखचंद्रमा’ हे नाट्यगीत, संत तुळशीदासांचा एक अभंग सादर केला. ‘विलोभते मधुमीलनात या’ हे नाट्यगीत, कविवर्य सुरेश भटांची ‘पूर्तता माझ्या व्यथेची’ ही गझल, ‘डोळे तुझे बदामी, देती मला सलामी’ हे भावगीत. शारदा नाटकातील एक पद, ‘संत हेच चालते बोलते भूमीवरी’ व ‘स्वामी सखा तू साईनाथा’ ही स्वरचित भक्तिगीते, ‘चांद माझा हा हासरा’ हे ‘देवमाणूस’ नाटकातील गीत, ‘आयोजी रामरतन धन पायो’ हे संत मीराबाईचे भजन, ‘जय गजानन श्री गजानन’ हे गजानन महाराजांवरील स्वरचित भक्तिगीत अशी एकाहून एक सरस गीते/अभंग सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यानी ‘कारे ऐसी माया कान्हा लाविली’ या भैरवीने केला.

अनेक गायकाना समर्थपणे तबल्याची साथ करणारे व सोबतीचे सभासद श्री जांभेकर यानी तबल्याची साथ केली तर सोबतीच्या अनेक संगीताच्या कार्यक्रमात संवादिनीवर कौशल्याने साथ करणारे श्री. मधुकर देसाई यानीही कार्यक्रमात रंगत आणली.

प्रत्येक चीज सादर करण्यापूर्वी श्रीमती सुनंदा गोखले यांच्या समर्पक व अलंकरित भाषेतील निवेदनानॆ कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

अशी ही संगीतमय सायंकाळ सभासदाना आगळा आनंद देउन गेली.

Wednesday, October 21, 2009

किती काटकसर [ व्हियेतनाम]


















हे फोटो कांही महिन्यांपूर्वी e-mail ने मिळाले. Source अज्ञात. त्यामुळे फोटोग्राफीचे श्रेय कोणाला देणेही अशक्य.