Sunday, October 18, 2009

चीनची प्रगतीपथावर घोडदौड

दोन हजार चारच्या एप्रिलमधे मला पूर्वेकडील जपान, चीन व हॉंगकॉंग या देशांच्या स्थलदर्शनाचा योग आला.आठ दिवसांत जो चीन पाहिला तो विस्मयकारक होता. तेथे जाण्याअगोदर चीनच्या आधुनिकतेबद्दल माझे मत फ़ार चांगले नव्हते. लहानपणी धड्यात चीनी बापाचा “माझं ते मरतुकडं द्वाड पोर…” असा न्यूनगंड असलेला, स्वत:च्या मुलाबद्दलचा उल्लेख अजून आठवतो. चीनी कापडविक्रेते चीनी कापडाचे भलेमोठे गाठोडे सायकलवर घेऊन खेडोपाडी जाताना मी स्वत: पाहिल्याचे स्मरते. असो!
२८ एप्रिलला आम्हाला घेऊन जपान एअरलाइन्सचे विमान जपानमधील ओसाकाच्या कानसाइ विमानतळाहून चीनमधील बीजींगकडे झेपावले. सुमारे २ तासांच्या भरारीनंतर आम्ही बीजींग तळावर उतरलो आणि विस्मयाचा पहिला धक्का बसला.मी, तोपर्यंत पाश्चात्य जगातील बरेच विमानतळ पाहिले होते. त्यांच्या मानाने हा तळ फ़ार मोठा व आधुनिक म्हणता येणार नाही. पण मला तुलना भारताशी करायची होती. त्या मानाने हा व चीनमधील मी पाहिलेले इतर तळ उजवेच होते.ऑलिंपिक नंतर तो आणखीनच सुधारल्याचे कळते. बीजींगमधे Pek Guangyun हॉटेलांत विसावलो. Yong Mei ही सुंदरी मार्गदर्शिका होती. तिच्या बरोबर शहरांत अद्यावत बसमधून फ़ेरफ़टका, Jade Factory,टेंपल ऑफ़ हेवन, हसरा शाक्यमुनी (बुद्ध), बादालिंग जवळ द ग्रेट वॉल ऑफ़ चायना, गु गॉंग (The Forbidden City), टिएन मिन चौक, चेअरमन माओची भव्य कबर व चायना सिल्क फ़ॅक्टरी पहाता आली.
द ग्रेट वॉल ऑफ़ चायना हा एक चमत्कारच आहे. म्हणे, चंद्रावरूनही ही भिंत उघड्या डोळ्यांना दिसते. परकीयांपासून संरक्षण करण्याकरिता उभारलेली ६ ते ७ हजार कि. मि. लांबीची ही भिंत, जमिनीच्या उंच-सखलपणानुसार, ८ ते १५ मिटर उंच व बरीच रुंद आहे. अंतराअंतरावर टेहेळणी बुरूज आहेत. शत्रूची चाहूल लागल्यास, बुरूजांवर पलिते पेटवून व वाद्ये वाजवून त्याची बातमी देण्यात येई. बीजींगहून ७० कि. मि. प्रवास करून, अद्ययावत बसने बादालिंगला आलो व तेथून रोपवेने वॉलजवळ पोहोचलो. महागडे तिकीट काढून वॉलवर आलो व ३-४ फ़र्लॉंग फ़ेरफ़टका मारला. पॉलिश केलेल्या काळ्या दगडाच्या स्लॅबवर छिन्नीने टाके घालून सुरेख चित्रशिल्प काढणारे कलाकार तेथे होते. मी मोनालिसाचे एक चित्रशिल्प घेतले. जेथे टाका बसतो तो टिंबाकृती भाग पांढरा दिसतो. वर्षाकाठी १३ कोटी प्रवासी येथे येतात. ’फ़र्बिडन सिटी’ अनेकांनी National Geographic Channel वर पाहिली असेल. प्रचंड विस्तार व अनेक भव्य वास्तू व संग्रह असलेला हा जुना राजवाडा, कम्युनिस्ट सत्तेवर येईतो, सामान्य जनतेला बंद होता. येथील प्रमूख वास्तुला १००० खोल्या आहेत. पलिकडे लागूनच, टियेन मिन चौक हा जगांतील सर्वात मोठा चौक आहे व राजवाड्याकडे पाठ केलेला, माओचे भव्य अर्धचित्र (bust) आहे. माओ कधीही या राजवाड्यांत फ़िरकला नाही असे म्हणतात. चौकाच्या दुस‍‍र्‍या बाजूला माओची भव्य कबर आहे. चौकाच्या चारही बाजूना, गजबजलेले रुंद रस्ते आहेत. चौकातून फ़िरताना,स्वातंत्र्यप्रेमी विद्यार्थ्यांचे याच चौकांत झालेले हत्याकांड साहजीकच आठवले. रस्त्यांवर भिकारीसुद्धा दिसले. रेशीम व्यवसाय हा चीनचा मोठा उद्योग आहे. येथील रेशीम फ़ॅक्टरीत, कोशांतून धागा काढण्यापासून सर्व क्रिया पहायला मिळाल्या. दोनही बाजूला रेशमी अस्तर असलेल्या व मध्ये रेशमी धाग्याची दाट व जाड जाळी असलेल्या दुलया करण्याची पद्धत नाविन्यपूर्ण होती. याकरिता विषेश प्रकारचे (आंत जुळे असलेले ) कोश वापरतात. या दुलया खूपच महाग असतात. रात्री फ़ेंग टँग थियेटर मधे, थरारक गंग फ़ू मार्शल आर्ट लाइव्ह शो पाहिला.
बीजींग सोडताना, टूर गाइडचा e-mail id घ्यायला विसरलो नाही. प्रत्येक शहरात गाइड वेगळी/ळा असे. त्या सर्वांचे e-mail id घेतले. बहुधा ते खरे नसावेत. त्यांना भारतांतून पाठविलेल्या सर्व मेल्स परत आल्या.
China Southern कंपनीच्या विमानाने २८ एप्रिलला बीजींग सोडले२ तासाच्या हवाई मार्गाने झिऍनला पोहोचलो. हॉटेल झिऍन एम्प्रेसमधे उतरलो. ली यिंग ही सुंदरी आमची गाइड होती. झिऍन एके काळी चीनची राजधानी होती. येथील प्रेक्षणीय ठिकाणे – बुद्धिस्त थॅंक्सगिव्हिंग टेंपल, वाइल्ड गूज पॅगोडा, टी आर्ट फ़ॅक्टरी (अनेक प्रकारचे हर्बल चहा ), सेरॅमिक फ़ॅक्टरी-टेरा कोट्टा म्युझियम-किन(चिन) कालीन अवशेष दाखविणारे उत्खनन व टॅंग डायनास्टीबद्दलचा लाइव्ह शो. टॅंग डायनास्टी हा चीनच्या इतिहासातला सुवर्णकाल समजला जातो. यांपैकी विशेष म्हणजे किन डायनास्टीचा एक कप्पा उलगडून दाखविणारे उत्खनन. त्या काळच्या समजुतीप्रमाणे, सम्राट मेल्यानंतर, तो आपले सैन्य, मंत्रीमंडळ व इतर गोतावळा घेऊन स्वर्गस्थ होतो. येथील उत्खननात माणसांच्या उंचीच्या, राजा, मंत्रीमंडळ व हजारो लढवैय्यांच्या भट्टीत भाजलेल्या पोकळ मूर्ती आढळल्या. कोणत्याही दोन मूर्तींचे चेहरे सारखे नाहीत.हे सर्व जमिनीखाली जेथे सापडले तेथेच जतन करून ठेवले आहे. प्रेक्षक ते वरूनच पाहतात. उन-पाऊस-वा‍र्‍यापासून रक्षण करण्यासाठी, वर सुंदर इमारत उभारली आहे. समोर सुंदरसा बगिचाही आहे. संशोधन करून विशिष्ट प्रकारची माती वापरून, विशिष्ट प्रकारच्या भट्टीत भाजून हुबेहूब तशा पोकळ मूर्ती आता करणे शक्य झाले आहे. यांच्या अति छोट्या प्रतिकृती प्रवासी हौसेने विकत घेतात. हे चित्रण सुद्धा National Geographic Channel वर कधी कधी दाखवतात. अतिशय सुंदर पेहेराव केलेले कलाकार, टॅंग डायनास्टीचा सुवर्णकाळ दाखविणारा कार्यक्रम सुमारे तासभर, संध्याकाळी करतात.जिथे जिथे आम्ही गेलो, त्या त्या शहरांत असे शोज होते व ते सर्वच खूपच सुंदर होते.
झिऍनहून हैनान एअरलाइनने आम्ही गुइ लिनला दोन तासांत पोहोचलो. चीन हा खंडप्राय देश आहे व आम्ही भेट दिलेल्या शहरांमधील अंतर पाहता, विमानाने प्रवास करणेच योग्य होते. येथे मुक्काम गुइ लिन दांगुइ ऑसमॅथस हॉटेलांत होता. शेन चिउ गुइ ही सुंदरी आमची गाइड होती. गुइ लिनमधील आयुष्य आरामांत जगण्याचे व संथ – गोव्याच्या भाषेंत.. सुशेगात..!
जड (heavy) उद्योग नाहीतच. अर्थव्यवस्था पुष्कळशी टूरिझमवर अवलंबून आहे.येथे आम्ही ली नदीवर चार तास river boat ride घेतली. बोटीवरच ड्रिंक्स व खाण्याची व्यवस्था होती. नदीच्या काठाने, आपल्याकडे जडी-बुटी विकणार्‍या “खानदानी- आयुर्वेदिक ” रोडसाइड दवाखान्याचे जे बोर्ड असतात, त्यावर काढलेल्या डोंगरांसारखे दिसणारे विचित्र आकाराचे डोंगर होते. सलग अशी पर्वतमाला नव्हती.नदीच्या काठाला, एका ठिकाणी cormorant या बगळ्यासारख्या दिसणार्‍या पाळीव पक्ष्याच्या सहाय्याने मासे पकडणे चालू होते. कॉर्मोरंटच्या गळ्यांत एक पोकळी असते. मासा पकडला की तो गिळून न टाकता, तो ह्या जागेत ठेवतो व त्याचा पालक तो मासा काढून घेऊन त्याला पुन: मासेपकडीकरिता सोडतो.
या भागांत मुंग्या व साप वापरून औषधी आसवे (wines) तयार करतात. त्यावेळी चीनमधे ’सार्स’ नांवाचा हल्लीच्या बर्ड
फ़्लू – स्वाइन फ़्लू सारखा रोग फ़ैलावत होता. विचारणा करता गाइड म्हणाली की चीनमधील कॅंटन भागातले लोक, इतर लोक खात नाहीत असे सर्व प्रकारचे सजीव प्राणी खातात. त्यामुळे, कदाचित या रोगाचा प्रादुर्भाव होत असावा. ’Reed Flute ‘ म्हणजे बांबूची बांसरी ही stalactite & stalagmite ची शिल्पे असलेली नितांतसुंदर गुहा येथील एक भव्य आकर्षण आहे. यांचा शोध १९५९ साली लागला. वर्षाकाठी सुमारे ७० ते ८० लक्ष लोक ही गुहा पहायला येतात.लांबलचक रांगेत उभे राहून व महागडे तिकिट काढून आम्ही प्रवेश मिळविला. क्षारांनी संपृक्त असे थेंब गुहेच्या छतावरून खाली पडण्याआधीच त्यांतील पाण्याचा अंश निघून जातो व एकानंतर एक अश्या थेंबांतील फ़क्त क्षारांचे मनोरम क्षारशिल्प
दीर्घ कालानंतर आकारते. अजूनही ही क्रिया चालूच आहे. तोच प्रकार गुहेच्या तळाशी असलेल्या क्षारशिल्पांचा. छतावरचे थेंब, एका पाठोपाठ खाली पडून, तळाशी हे शिल्प आकारते. गुहा खूपच मोठी आहे व आंत रंगित विद्युतप्रकाश, मंद संगीत व जायला आखून दिलेले मार्ग आहेत. एके ठिकाणी छतावर, क्षारांचा असा झिरझिरीत पडदा तयार झालाय की एका बाजूचा प्रकाश त्या पडद्याच्या पलीकडूनही दिसतो. शा सरोवराच्या सान्निध्यांत असलेले Sun (ब्रासचा असल्यामुळे पिवळा) व Moon (पांढ‍र्‍या लाकडाचा) पॅगोडा चंद्रप्रकाशांत फ़ारच सुंदर दिसले. एलेफ़ंट ट्रंक पार्क मधे हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा खडक आहे . सकाळची वेळ होती व एकत्रीत स्त्री-पुरुषांचा जमाव तालबद्ध व्यायाम करीत होता. असे दृष्य सकाळी वा सायंकाळी सर्वत्र दिसते. कांही ठिकाणी तालाकरिता ड्र्म्स वापरतात. त्या दिवशी, सायंकाळी सर्वजण अतिशय थकले होते. त्यावेळी आम्हाला एका चीनी वैद्यकीय केंद्रात नेले. तेथे चीनी रिफ़्लेक्सॉलॉजी पद्धतीने शरीराला मॉलिश देतात. एकाच वेळी आम्हा १५ जणांना १५ प्रशिक्षित तरूण-तरुणींनी सुमारे अर्धा तास मॉलिश केले. मला मॉलिश करणारी पंचविशीच्या घरांतील मुलगी होती. बहुतेकांना फ़ारच तुटक इंग्रजी समजत होते. मॉलिश करतांना ती म्हणाली, तुम्ही चाळिशीचे दिसता. त्या वेळी मी वास्तविक पासष्टित होतो. तिच्या वाक्यातला खोडकरपणा जाणवून मी तिला म्हणालो, तू बहुतेक पंधरा-सोळा वयाची असशील ना? सर्वजण-जणी असेच हंसत-खिदळत मॉलिश करत होते-होत्या. आश्चर्य म्हणजे, मॉलिश केल्यानंतर सर्वांचा थकवा पार निघून गेला. ह्याकरिता खर तर कांहिही चार्ज नव्हता. आम्ही प्रत्येकी १-२ अमेरिकन डॉलर टिप दिली.
त्यांच्या फ़ार्मसीमधे सर्वच व्याधींकरिता चीनी औषधे उपलब्ध होती. आम्हा प्रत्येकाला काय व्याधी आहे ते विचारून औषध सुचविण्यात आले व ते विकत घेण्याबद्दल सुचविण्यात आले. रात्री याओ – मियाओ या सुंदर मायनॉरिटी कम्युनिटीचा, प्रत्येकी, अमेरिकन १२.५० डॉलर्सचे तिकिट काढून लाइव्ह शो पाहिला. तो संपल्यानंतर, तो पहण्याकरिता भरलेल्या पैशांचे अजिबात दु:ख झाले नाही इतका तो सुंदर होता.
१ मेला आम्ही Air China ने शांघायकडे प्रयाण केले. शांघायला मुक्काम Shanghai Ling An हॉटेलांत होता. १ कोटी ३० लाख लोकवस्तीचे हे शहर बरेच महागडे आहे. याहीपेक्षा जास्त लोकसंख्या -३कोटी- चुंग किंग येथे आहे. चीनमधील आघाडीचे राजकीय नेते शांघाय येथीलच आहेत. येथील गाइड झू चाओ यी हा मात्र इंग्रजी जाणणारा होता.सर्वच गाइडना इंग्रजी नांवेही असतात. उदा. हा Allan, बीजींगमधली Ivy, झिऍनमधली Jo Sie, गुइ लिनमधली Autumn. आतापर्यंतचे/च्या सर्व गाइड ईश्वरावर विश्वास न ठेवणारे (Atheist) होते. चीनमधे, वस्तू विकत घेताना मोठ्या प्रमाणांत सौदा करावा लागतो. येथे, मी चीनी सरकारी दुकानांत, Jade ची बांगडी, जिची किंमत ९० डॉलर सांगण्यात आली, घासाघीस करून, अखेर ३० डॉलर्सना विकत घेतली. चीनमधे १ ते ७ मे राष्ट्रीय सुट्टी असते. १ मेला शांघायमधे १० लक्ष प्रवासी बाहेरून आले होते. शांघाय हे सर्वच दृष्टीनी छान, भव्य व प्रगत शहर आहे. आम्ही मुंबईचे शांघाय करू ही नक्कीच राजकीय वल्गना ठरेल इतके ते प्रगत आहे.
४ टनांची एकाच तुकड्यात कोरलेली, ब्रम्हदेशांतून आलेली शुभ्र जेडची मूर्ती ’White Jade Reclining Buddha Temple’ मधे विराजमान आहे. हुआंग-पू नदीवरील ’बंड’ हा भाग पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यांत होता तो जुन्या सुंदर इमारती व बगिचे यांमुळे फ़ारच नयनरम्य आहे. येथील रिव्हर पार्कमधून शांघायचे मनोरम दृष्य दिसते. नदीपलीकडील T.V.टॉवर,याला ओरियेंटल पर्ल टॉवर असेही म्हणतात, उंचीने जगांतील तिसर्‍या क्रमांकाचा, ४६८ मि. उंच – टोरोंटो व मॉस्कोनंतरचा - TV मनोरा आहे. नदी पार करताना, सरकत्या जिन्याने आम्ही नदीच्या पातळीच्या खूप खाली गेलो व नंतर remote control असलेल्या ट्रॉलीतून, टनेलमधून नदीपलीकडे गेलो. टनेलमधे प्रकाश व ध्वनी यांचा डोळे व कान सुखावणारा खेळ आहे. सुपरफ़ास्ट लिफ़्टमधून मनोर्‍यावरील Viewing Gallery मधे गेलो. इतक्या उंचीवरून विस्तृत प्रदेशाचे विहंगम दर्शन होते. तळमजल्यावर प्रचंड शॉपिंग मॉल आहे. मनोर्‍याच्या बाजूलाच Ocean Museum & Aquarium आहे. तेथील सरकता रस्ता असलेला टनेल, जगांतील सर्वांत लांब-१५५ मि.-अक्वेरियम व्ह्युइंग टनेल आहे. एका बाजूने यांत प्रवेश केला की आपण आपोआप पुढे जातो व दुसर्‍या बाजूने बाहेर पडे पर्यंत पूर्ण अक्वेरियमचे दर्शन घडते. शांघायमधील प्राचीन यु बगिचा चीनी पद्धतीच्या बागेचा उत्कृष्ट नमुना आहे. सायंकाळी, आम्ही Acrobatic Show पाहिला. एका मृत्युगोलांत, ४ तरुणी व १ तरूण, ५ मोटरसायकलींवर, एकाच वेळी फ़ेरे मारतात ते पाहून अंगावर काटा उभा रहातो.
शांघायला, कामाचा कमितकमी मोबदला तासाला ७५ भारतीय रुपये मिळतो. बेकारी भत्ता, तासाला ५० रुपये, २ वर्षेपर्यंत मिळतो. त्या वेळी बेकारीचे प्रमाण ६ टक्के होते. मासिक रु. १३००० पेक्षा जास्त प्राप्ती असेल तर २ ते २० टक्के
प्राप्तीकर भरावा लागे. लांच-लुचपत मध्यम प्रमाणांत असल्याचे कळले. हा गाइड व त्याची पत्नी, दोघेही त्यांच्या आई
वडीलांची एकुलती एक अपत्ये. त्यामुळे या दांपत्याला दोन मुलांना जन्म देण्याची मुभा आहे. एअरपोर्टकडे परतत असताना, बाजूने, ट्रेनसारखे एक वाहन, झपकन गेले. चौकशी करता कळले की ती अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाची, चुंबकीय लहरींवर तरंगत ३५० कि. मि. गतीने फ़ारसा आवाज न करता जाणारी, जगातील एकमेव मॅगलेव्ह (magnetic levitation) ट्रेन होती. प्रचंड गतीमुळे आम्हाला ती नीट पाहताही आली नाही.
येथून China Eastern च्या विमानाने आम्ही शेन झेन ला रवाना झालो व तेथे CMPC हॉटेलमधे उतरलो. गाइड, यॅंग चेंग यू (Jim) हा गॉंग फ़ू पंथाचा अनुयायी होता. जगातले मी भारतासह १० देश व तेथील शहरे पाहिली. या सर्वांत, गर्द वृक्षराजी व सुंदर फ़ुलबागांच्या बाबतींत हे शहर उजवे वाटले. येथील Window Of The World मधे, जगातील प्रसिद्ध इमारतींच्या (ताजमहाल, आयफ़ेल टॉवर, लुव्र मुझियम वगैरे..) कांही प्रमाणात लहान अशा प्रतिकृती आहेत.घोड्यांची बग्गी राइड व मोनोरेलने आंत भटकता येते. सुर्यास्तानंतर, २ तासांचा जगाच्या संस्कृती दाखवणार शो व नंतर फ़टाक्यांची भव्य आतशबाजी पहायला प्रचंड गर्दी असते व शो नीट दिसावा म्हणून मोक्याची जागा मिळविण्याकरिता रेटारेट होते. मेनलॅंड चायनामधील हा शेवटचा मुक्काम ! या नंतर चीनच्याच ताब्यांत असलेल्या हॉंगकॉंग ला जायचे होते. ४ मेलादीड तास बसने प्रवास करून चीनच्या सीमेवर पोहोचलो व तिथले सोपस्कार पूर्ण करून कांही पावले चालून हॉंग कॉंगच्या सीमेवर आलो. दोन देशात असतात तशा कस्टम्सच्या प्रथा सांभाळून हॉंग कॉंग मधे प्रवेश केला.
चीनमधे Left Hand Drive ने वाहतुक चालते. चीनने केलेली व करीत असलेली प्रगती थक्क करणारी आहे. शहरांत ६ ते ८ लेनचे सुंदर गुळगुळीत रस्ते, ५०-६० मजल्याच्या भव्य व आधुनिक शिल्पशास्त्रांतील प्रगती दाखवणार्‍या इमारती, रस्त्याच्या दोनही बाजूला छान कटाइ केलेले वृक्ष व स्वच्छ आणि इलेक्ट्रॉनिक फ़्लश असलेली स्वच्छतागृहे प्रत्येक हॉटेलांत दिसली. टाऊन प्लॅनिंग करताना आपल्यासारखी कोर्टबाजी होत नाही. सर्व भूमी सरकारची असते.जुन्या वास्तू पाडून नवे कांही करायचे ठरले – हे काम प्रचंड वेगाने, आधुनिक यंत्रे वापरून सुरू आहे- की तेथील रहिवाशांनी कोठे व केव्हा जायचे हे कळविले जाते. या करिता, जागा- धन-त्या ठिकाणी व्यवसाय-शाळेत प्रवेश, या करिता सरकार मदत करते. हे करतांना सर्व उपलब्ध अधिकार, विचारशक्ति व यांत्रिक शक्ति वापरली जाते. चीनचे नव्या युगांत जाण्याचे कार्य, मानवी भावना व अधिकारांची फ़ारशी कदर न करता चालू आहे असे दिसते. इंग्रजीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. रस्त्यांवरील फ़लकांवर व दुकानांवर इंग्रजी अक्षरे दिसली. परंतू बहुसंख्य प्रजेला इंग्रजीचा गंध नाही. चीनी लोक फ़ार सौजन्यशील वाटले.परदेशी प्रवाश्यांकडून होणार्‍या मोठ्या प्राप्तीची त्यांना कल्पना आहे. मेनलॅंड चीन मधील लोकाना हॉंग कॉंग मधे प्रॉपर्टी करायला मुभा आहे पण हॉंग कॉंग वासियांना मेनलॅंड चीन मधे प्रॉपर्टी करण्याची परवानगी नाही. असा हा मी पाहिलेला चीन.

No comments: