Sunday, October 04, 2009

नवरात्री







नवरात्रीनिमित्त कार्यक्रम
नवरात्रीनिमित्त दिन. २३ सप्टेंबर रोजी सोबती सभासदानी विविध कार्यक्रम साजरे केले.
सुरुवातीला देवी अंबाबाईचे गीत आपल्या सुस्वर आवाजात श्रीमती विद्या पेठे, नंदा देसाई व शीला निमकर यानी सादर केले. तबल्यावर श्री. सुरेश निमकर होते आणि संवादिनीवर श्री. मधुकर देसाई.
श्री. माधव बागूल यानी राजा बढे यांचे गजानन वाटवे यानी गायलेले भावगीत सादर केले. शिवाय त्यांचे एक विशेष कौशल्य म्हणजे ते शीळ वाजवून गाणे सादर करतात. एक नाट्यगीत त्यानी शीळ वाजवून सादर करून सभासदांची वाहवा मिळविली.
एक सभासद श्रीमती ठोसर यानी पुल रचित विडंबनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्याची पार्श्वभूमी होती पुल यांच्या घरची तथाकथित भोजनाची पंगत. निमंत्रित होते दिग्गज कलावंत/ गायक - पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, जितेंद्र अभिषेकी आणि इतर नामवंत. त्यांच्या आवाजाची नक्कल करीत अनेक पक्वानांसंबंधित विडंबने श्रीमती ठोसर यानी सादर केली. उदा. पं. भीमसेन जोशी यांच्या सुप्रसिद्ध ‘इंद्रायणी काठी’ या अभंगावर आधारित ‘बासुंदीची वाटी लावियली ओठी’, जितेंद्र अभिषेकी यांच्या नेहमीच्या ‘माझे जीवन गाणे’ यावर आधारित ‘माझे जेवण झाले’. तसेच लता मंगेशकर, आशा भोसले आणि इतर गायकांच्या गाण्यांवरही विडंबने सादर केली. मात्र विषय होता पक्वानांशी संबंधित. तसेच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या भोजनाला येउ शकत नाही यावरही ‘येउ कशी कशी मी जेवायला’ हेही विडंबन सादर केले.
भोजन समारंभाची सांगता म्हणून पुलंचे भैरवीवर आधारित विडंबनही मजेशीर होते. सर्वानी भोजनावर ताव मारल्याने त्याना जेवायला काही उरले नाही असे त्यानी सर्वाना सांगितले. मात्र भोजनोत्तर दक्षिणा देण्याची पद्धत बंद केल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.
एकंदरीत हा कार्यक्रम बहारदार व सभासदांचे भरपूर मनोरंजन करणारा ठरला.
श्री. म.ना. काळे यानी दोन विनोद सांगून हास्यरंगाचा शिडकावा केला. श्री. कृष्णकुमार प्रधान यानी आपली एक कविता सादर केली. श्रीमती विजया लेले यानी निवडणूक संबंधित एक स्वरचित विडंबन काव्य सादर केले. श्री. शंकररव लिमये यानी भारुड पद्धतीचे एक गाणे सादर केले. श्रीमती विनयशील गोविलकर यानी ‘ मुडाप ’ (mood off) हा विषय घेऊन सासू सुनेमध्ये कसा गोंधळ उडाला याचा अनुभव विनोदी पद्धतीने सादर केला. त्यांचे सादरीकरण विनोदी आणि बहारदार होते.
वय विसरुनी अपुले
नाचले आनंदे सारे
स्त्री सभासदानी संगीत भोंडला सादर केला. भोंडल्याचा नाच प्रेक्षणीय होता.
शेवटी स्त्री व पुरुष सभासदानी गाण्यांच्या तालावर गरबा सादर केला. सहभागी सभासद, अगदी ८६ वर्षांचे सुद्धा, वय विसरुन नाचले आणि समारंभात आगळी रंगत आणली.
एकंदरीत हा नवरात्री निमित्त सादर झालेला कार्यक्रम सर्वाना आनंद देउन गेला.

No comments: