Sunday, October 25, 2009

आपले कुटुंब पहिले ... वनस्पती विश्वांतही ...

आपल्या कुटुंबांतील व्यक्तींविषयी आस्था ठेवणे व सुखदु:खे वाटून घेणे या भावना मानव व प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींतही असतात. हर्ष बैस व त्यांचे सहकारी यांनी डेलावेअर विश्वविद्यालयांत केलेल्या संशोधनांत हे दिसून आले आहे. ‘पाण्यापेक्षा रक्ताची घनता जास्त – blood is thicker than water ’ हे वनस्पतींतही खरे आहे. बैसनी ३००० पेक्षा जास्त वनस्पतींचा अभ्यास ३ वर्षे केला. ’अरॅबिडॉप्सिस थॅलियाना ’ या मोहरीवर्गातील वनस्पतींत असे दिसले की एकाच ’आई ’ पासून उगवलेल्या रोपांत व त्यांच्या आईत जी चढाओढ दिसत नाही ती दुसर्‍या ’आयांपासून झालेल्या रोपांत मात्र दिसते. एखादे रोप आपला भाऊ वा बहीण कसे ओळखते ? त्यांच्या मुळांतून जो द्रव पाझरतो त्या द्वारे ही ओळख होते. जेव्हा एखाद्या रोपाला शेजारील रोप आपल्या कुटुंबातील नाही हे कळते तेव्हा ते जास्त मुळांची निर्मिती करून, जमिनींतील पोषक द्रव्ये व पाणी चढाओढीने ओढून घेण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याच ’बंधु- भगिनी’ आसपास असताना असे होत नाही. मुळांचा श्राव निर्माण होण्याची क्षमता नष्ट होईल अशा रसायनाचा बैस यांनी रोपांवर प्रयोग केला तेव्हा असे दिसले की त्या रोपांनी आपल्या कुटुंबाची ओळख होण्याची क्षमतासुद्धा गमावली.
[ साइरा कुरुप यांच्या टाइम्स ऑफ इंडियातील लेखांतून ]

No comments: